यंदा दीड दिवसाच्या गणरायाची संख्या २० हजारांनी कमी; घरच्या घरी, सोसायटीच्या आवारात विसर्जनाला प्राधान्य

मुंबई : अनेक घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी घरीच किंवा गृहनिर्माण संस्थेच्या आवारात गणेशमूर्तीचे विसर्जन के ल्याने समुद्रकिनारे, नैसर्गिक-कृत्रिम तलाव अशा पालिके ने व्यवस्था के लेल्या सार्वजनिक स्थळी विसर्जित होणाऱ्या दीड दिवसांच्या गणेशमूर्तीची संख्या यंदा २० हजारांनी घसरली आहे.

रविवारी दीड दिवसांच्या गणेशमूर्तीना निरोप देण्यात आला. तब्बल ४० हजार ८२३ गणेशमूर्तीचे रविवारी विसर्जन करण्यात आले. गतवर्षांच्या तुलनेत ही संख्या तब्बल २० हजाराने कमी आहे. काही भाविकांनी घरीच, तर काहींनी मंडळांच्या कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करणे पसंत केले. त्यामुळे रविवारी समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी कमी होती.

करोनाच्या संकटामुळे यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले होते. त्याला भाविकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुंबईत साधारण १२ हजार सार्वजनिक, तर दोन लाखांच्या आसपास घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना केली जाते. यंदा करोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन घरगुती गणेशमूर्तीचे घरीच, अथवा जवळच्या कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करावे, असे आवाहन मुंबई महापालिके कडून वारंवार करण्यात येत होते. या आवाहनाला दीड दिवसांच्या गणेश विसर्जनाच्या निमित्ताने नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.

नैसर्गिक आणि पालिकेच्या कृत्रिम तलावांमध्ये ४०,८२३ गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यात घरगुती ३९,८४५, तर सार्वजनिक ९७८ गणेशमूर्तीचा समावेश होता. यापैकी २२,१४९ घरगुती, तर ७१० सार्वजनिक अशा एकूण २२,८५९ गणेशमूर्तीचे पालिकेच्या कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले. तर करोनाच्या भीतीपोटी काही भाविकांनी घरी, सोसायटीतील किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन केले असून आकडेवारीची नोंद होऊ शकली नाही. गेल्या वर्षी दीड दिवसांच्या ६१,७२९ गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले होते. त्यापैकी १४,४९० गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले होते. तसेच ९७८ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी ७१० मंडळांनी नैसर्गिक स्थळी जाणे टाळत कृत्रिम तलावात विसर्जन केले.

‘तो’ खोडसाळपणा

खारदांडा परिसरातील कृत्रिम तलावाच्या आसपास काही गणेशमूर्ती ठेवल्याची छायाचित्रे सोमवारी समाजमाध्यमांवर फिरत होती. महापालिकेवर भरवसा ठेवू नका, असेही त्यात नमूद करण्यात आले होते. मात्र असा कोणताही प्रकार घडलेला नाही. कोणीतरी हा खोळसाडपणा केला असावा, असे पालिका अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

माती उद्यानांसाठी

नैसर्गिक विसर्जनस्थळांवर भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी पालिकेने मुंबईत १७० ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले. यात विसर्जित झालेल्यांमध्ये शाडूच्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तीचा समावेश आहे. शाडूच्या मूर्ती काही तासातच पाण्यात विरघळल्या. हे पाणी उद्यानांमधील झाडांना घालण्यात येणार आहे.

फिरत्या तलावांनाही प्रतिसाद

विसर्जनासाठी भाविकांना समुद्रावर किं वा तलावाच्या ठिकाणी जावे लागू नये म्हणून पालिकेने यंदा प्रथमच ‘विसर्जनस्थळ आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत फिरत्या तलावांची सुविधा उपलब्ध केली होती. फिरत्या तलावात पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील गिरगाव, ग्रॅन्ट रोड, ताडदेव, मुंबई सेंट्रल परिसरातील २७, तर ‘के-पश्चिम’मधील अंधेरी पश्चिम भागात ६५ गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. मात्र त्याच वेळी ‘जी-उत्तर’मधील दादर, माहीम, धारावी परिसरात फिरत्या तलावात २९६ मूर्तीचे विसर्जन केले. कृत्रिम तलावात ‘डी’ विभागात १,५१५, ‘के-पश्चिम’मध्ये २,४२८ मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

दीड दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन

२०१९       २०२०

सार्वजनिक          २०१         ९७८

घरगुती            ६१,७२९       ३९,८४५

एकूण              ६१,९३०     ४०,८२३