मुंबई : रुपारेल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन तासिका सुरू झालेल्या नसून त्या लवकरात लवकर सुरू कराव्यात अशा आशयाचे पत्र युवासेनेने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक  डॉ. धनराज माने यांना लिहिले आहे.

सध्या सर्व महाविद्यालयांच्या तासिका ऑनलाइन सुरू असताना माटुंग्याच्या डी. जी. रुपारेल महाविद्यालयाच्या स्वयंअर्थसाहाय्यित विभागाने मात्र द्वितीय व तृतीय वर्षाच्या तासिका अद्याप सुरू के लेल्या नाहीत. शिक्षकांची भरती न झाल्यामुळे तासिका थांबवण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षक भरती प्रक्रिया त्वरित सुरू करावी व विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन तासिका सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी कुलगुरू, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक यांना हे पत्र लिहिले आहे. महाविद्यालयावर कारवाई करण्याचीही मागणी या पत्रात करण्यात आली आहे.