अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेताच त्यांना उत्तीर्ण करण्याची मागणी मान्य करत विद्यार्थी संघटनांपुढे उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने लोटांगण घातल्यानंतर आता गेल्या सत्रात अनुत्तीर्ण झालेल्या विषयांमध्येही उत्तीर्ण करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून आधीच्या कामगिरीच्या आधारे मूल्यांकन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा घेण्याची सूचना दिलेली असताना आणि परीक्षांबाबत निर्णय घेण्याची स्वायत्तता विद्यापीठांना असतानाही विद्यार्थी संघटनांच्या मागणीपुढे नमते घेत शासनाने परीक्षा रद्द करण्याचे जाहीर केले. त्यावरून सुरू असलेला वाद अद्यापही शमलेला नाही. आता संघटनांनी आधीच्या सत्रात अनुत्तीर्ण झालेल्या विषयांमधूनही सूट देण्याची मागणी केली आहे.

अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द झाल्या तरी अनेक विद्यार्थी आधीच्या सत्रात काही विषयांत अनुत्तीर्ण (एटीकेटी) झाले आहेत. या विद्यार्थ्यांच्या राहिलेल्या विषयांच्या परीक्षेचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. एटीकेटीच्या परीक्षांबाबत अद्यापही स्पष्टता नाही. या विद्यार्थ्यांच्या राहिलेल्या विषयांतही त्यांना उत्तीर्ण करण्यात यावे, अशी मागणी संघटनांनी केली आहे.

‘एटीकेटी आणि बॅकलॉगबाबत योग्यवेळी शासन भूमिका स्पष्ट करेल. विद्यार्थ्यांनी चिंता करू नये. योग्यवेळी विद्यार्थी हिताचा निर्णय जाहीर करू,’ अशा आशयाचे ट्विट उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.