मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहात सोमवारी पवार यांच्या नियुक्तीची घोषणा केली. महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या वेळी हे पद शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे होते. पण हे पद अजित पवार यांच्याकडे जात असल्याबाबत सुभाष देसाई अंधारात होते असे समजते.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात विधान परिषदेतील सभागृहनेतेपद तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांकडे होते. तर मागील पाच वर्षे भाजप सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे हे पद देण्यात आले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले त्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केवळ सात मंत्र्यांचा शपथविधी झाला होता. त्या वेळी विश्वासदर्शक ठरावासाठीचे अधिवेशन व हिवाळी अधिवेशन तोंडावर होते. त्या पार्श्वभूमीवरशिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील आमदार या नात्याने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे विधान परिषदेतील सभागृहनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात शनिवारी बैठक झाली. त्यात  प्रथेप्रमाणे उपमुख्यमंत्री या नात्याने अजित पवार यांची विधान परिषदेतील सभागृहनेते म्हणून नियुक्ती करण्याचा आग्रह राष्ट्रवादीने धरला. त्यानुसार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी अजित पवार यांच्या नावाची घोषणा झाली. मात्र रविवारी रात्री उशिरापर्यंत शिवसेनेतील नेते-आमदारच नव्हे तर सुभाष देसाई यांना या घडामोडींची माहिती नव्हती असे समजते. सोमवारी अचानक या सर्व घडामोडी झाल्या.

सभापतींनी विधान परिषदेच्या तालिका सदस्यांचीही नियुक्ती केली असून त्यामध्ये गोपीकिसन बाजोरिया, डॉ. सुधीर तांबे, अनिकेत तटकरे आणि प्रा. अनिल सोले यांचा समावेश आहे.