देवेंद्र फडणवीस यांची मराठा संघटनांना सूचना

मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्य़ात मराठा समाजातील किमान एक हजार उद्योजक तयार होण्यासाठी सरकारच्या विविध योजनांतून कर्जपुरवठा करण्यात येईल. मराठा समाजातील तरुणांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मराठा समाजातील संस्था, संघटनांनी पुढे यावे, मध्यस्थ संस्था म्हणून (नोडल एजन्सी) काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविवारी केले.

मराठा बिझनेसमन फोरम व अखिल मराठा फेडरेशन यांच्यामार्फत रविवारी सायंकाळी एलफिन्स्टन रोड येथील मैदानावर मराठा सन्मान सोहळा पार पडला. त्यात ते बोलत होते. मराठा समाजाच्या विविध संस्थांच्या फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत पवार, प्रवीण दरेकर, आ. कालिदास कोळंबकर उपस्थित होते. मराठा समाजाच्या विकासासाठी कौशल्य विकासासह विविध कर्ज योजना, शिक्षणविषयक योजना हाती घेण्यात आल्या आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असून यासंदर्भातील न्यायालयीन अडचणी दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मराठा समाजासाठी राज्य शासनाने राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सुरू केली असून यातून ६०२ अभ्यासक्रमांत शुल्क प्रतिपूर्ती दिली जात आहे. मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे.   मराठा समाजाने मोर्चाच्या रूपाने विराट दर्शन दिल्यावर सरकार नतमस्तक झाले. राज्य सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी अनेक निर्णय घेतले, असेही  फडणवीस यांनी नमूद केले.

संस्थांचा गौरव

मराठा समाजासाठी काम करणाऱ्या खारघर मराठा समाज (नवी मुंबई), रत्नसिंधू मराठा मित्रमंडळ (नाशिक), कोकण मराठा संघ (पुणे), मराठा मंडळ (इचलकरंजी), श्री कुलस्वामिनी शारकाईदेवी मंडळ (बडोदे), वंदे मातरम युवा संघटन रोड मराठा (पानिपत), तेलंगण मराठा मंडळ या संस्थांचा सन्मान करण्यात आला. तसेच मराठाभूषण पुरस्काराने डॉ. डी. जी. हापसे, बळीराम कदम, पं. प्रशांत गायकवाड, ललिता बाबर, शंकरराव कोल्हे, कमलकिशोर कदम, प्रा. नरेंद्र विचारे यांना  सन्मानित करण्यात आले.