अमेरिकेत व्हिसा अर्जात दिलेल्या माहितीप्रमाणे मोलकरणीस वेतन न देणाऱ्या राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना अटक केल्याच्या प्रकरणानंतर आता दोन्ही देशांतील चर्चेअंती त्यात तोडगा दृष्टिपथात आला असून, अमेरिकेने खोब्रागडे यांना सुनावणीपूर्व प्रक्रियेतून वगळण्याचे जवळपास निश्चित केले आहे.
ही प्रक्रिया सोमवारी होणार होती. त्यात आता खोब्रागडे यांना हजर राहावे लागणार नाही, असे संकेत मिळत आहेत. एकप्रकारे भारताच्या राजनैतिक प्रयत्नांना उशिरा का होईना थोडे यश येताना दिसत आहे. जर खोब्रागडे यांना अमेरिकेने प्राथमिक सुनावणीच्या आधी होणाऱ्या प्रक्रियांतून सूट दिली नसती तर त्यांना आणखी वैद्यकीय चाचण्या, बोटांचे ठसे देणे अशा अनेक कटकटींना सामोरे जावे लागले असते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतीत अमेरिकेचा प्रतिसाद सकारात्मक दिसत आहे. परंतु आता ख्रिसमस तोंडावर आल्याने सरकारी कार्यालये बंद राहणार असून, पुढील निर्णय वेगाने घडवून आणण्यात भारत सरकारची कसोटी लागणार आहे. दरम्यान भारतातील अमेरिकी राजनैतिक अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांना त्यांची ओळखपत्रे परत करण्यास सांगितली होती त्याची मुदत सोमवारी संपत आहे.
भारताने देवयानी यांची बदली संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी दूतावासात केली आहे.मात्र याचा उद्देश त्यांना पुढील कारवाईपासून राजनैतिक अधिकाऱ्यांना असलेले संरक्षण मिळावे हा होता, पण असे संरक्षण पूर्वलक्ष्यी प्रभावाने देता येणार नाही, असे अमेरिकेच्या प्रवक्त्या साकी यांनी शनिवारी सांगितले होते.
दरम्यान, खोब्रागडे यांचा जी-१ व्हिसा व नवीन राजनैतिक ओळखपत्रासाठीचा अर्ज संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी दूतावासाकडून अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याकडे शुक्रवारी पोहोचला आहे. देवयानी खोब्रागडे यांची संयुक्त राष्ट्रातील भारतीय दूतावासात बदली केल्यानंतर त्यांना आता पूर्वीच्या प्रकरणातून सूट मिळणार किंवा नाही हा निर्णय अवघड असून, अमेरिकेचे परराष्ट्र खाते त्यावर विचार करीत आहे.