मुंबई : मेट्रो २ अ (दहिसर पूर्व ते डीएन नगर) मार्गिकेच्या एका अवघड टप्प्याचे काम शनिवारी पूर्ण झाले. पश्चिम रेल्वे मार्गावरील दहिसर आणि मीरा रोड या रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे रुळांवर लोखंडी तुळया उभारण्याच्या कामाचा यात समावेश आहे.

टाळेबंदीत काही काळ रखडलेल्या मेट्रो मार्गिकांच्या कामास सध्या गती आली असून, मे २०२१ पर्यंत ही मार्गिका कार्यरत करायचे उद्दिष्ट आहे. ‘मेट्रो २ अ’ चा मार्ग दहिसर ते मीरा रोड स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवरून जातो. या ठिकाणी शेकडो टन वजनाच्या तुळया उभारण्याचे काम एका रात्रीत पूर्ण करण्यात आले. मध्यरात्री १२.०५ पासून पहाटे ३.३५ वाजेपर्यंत हे काम करण्यात आले.

दहिसर येथील तुळयांची उभारणी नोव्हेंबरमध्ये होणे अपेक्षित होते; पण आम्ही हे कार्य विहित वेळेच्या दोन महिने आधी पूर्ण केले. या कामामुळे जानेवारी २०२१ ला होणाऱ्या चाचण्यांना गती प्राप्त झाली आहे. रेल्वे आणि मुंबई महापालिका अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे हे कार्य शक्य झाले.

– आर. ए.  राजीव, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त.