मुंबई : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात कृपाशंकर सिंग यांना भाजप सरकारने मदत केल्याचे त्यांच्या पक्षांतरामुळे स्पष्ट झाल्याची चर्चा काँग्रेस वर्तुळात मंगळवारी रंगली. विशेष म्हणजे महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीसाठीचे पक्षाचे उमेदवार निश्चित करण्याच्या बैठकीत कृपाशंकर सिंग सहभागी होते. त्यांनी प्रत्येक मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यावी, कोणाला देऊ नये, याबद्दल मतेही मांडली. त्यानंतर बाहेर येऊन त्यांनी राजीनामा जाहीर केला!

काँग्रेस पक्षात असूनही कृपाशंकर सिंग यांचे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादातून त्यांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चौकशीचे शुक्लकाष्ट लागले होते. राज्यात सत्ताबदल होताच भाजप सरकार त्यांच्या विरोधात कारवाईसाठी पावले उचलेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात भाजप सरकारने कृपाशंकर सिंग यांना मदतच केल्याचे जाणवले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुरुवातीच्या काळात तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. खडसे यांच्या विरोधात एका हॅकरने आरोप केले होते. या हॅकरला कृपाशंकर सिंग हे ‘वर्षां‘ बंगल्यावर घेऊन गेल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सरकारने न्यायालयात कृपाशंकर सिंग यांना मदत होईल, अशाच पद्धतीने भूमिका घेतली होती. शेवटी बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात कृपाशंकर सिंग आणि त्यांचे सारे कुटुंबिय निर्दोष मुक्त झाले. भाजप सरकारच्या मदतीमुळेच हे सारे शक्य झाल्याचे तेव्हा काँग्रेस नेत्यांचे म्हणणे होते. शेवटी कृपाशंकर सिंग यांनी भाजपचा मार्ग पत्करला यावरून भाजप नेत्यांनी त्यांना मदत केल्याचे स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया काँग्रेसमधून व्यक्त केली जात आहे.