सिग्नल यंत्रणेत बिघाड, वीज पुरवठा खंडित होणे आणि ओव्हरहेड वायर तुटणे, हे सर्व बिघाड ठाकुर्ली ते दिवा या स्थानकांदरम्यान एकाच दिवशी ठरावीक अंतराने झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक बुधवारी चांगलीच खोळंबली. डोंबिवली ते ठाकुर्ली या दरम्यान सकाळी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. त्यानंतर याच स्थानकांदरम्यान वीज पुरवठा खंडित झाला. तर दुपारीच कोपर ते दिवा या दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली.
बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास डोंबिवली ते ठाकुर्ली या दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक रखडली. ही वाहतूक सुरळीत होत नाही, तोच दुपारी २.१० वाजता कर्जतकडे जाणाऱ्या लोकलचा विद्युत प्रवाह याच दोन स्थानकांदरम्यान खंडित झाला. हा गोंधळ सुरू असताना कोपर आणि दिवा या स्थानकांदरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या जलद मार्गावर दुपारी २.१५ वाजता ओव्हरहेड वायर तुटली.
या दोन बिघाडांमुळे मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल ४० मिनिटे ठप्प होती. अखेर दुपारी तीनच्या सुमारास वाहतूक सुरू झाली. या दरम्यान दहापेक्षा जास्त उपनगरीय सेवा रद्द करण्यात आल्या. या बिघाडाचा फटका संध्याकाळी उशिरापर्यंत रेल्वेमार्गावर जाणवत होता.