दिवाळीतील फराळ आणि फटाक्यांची मजा घेत असतानाच त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. यावेळी फटाक्यांमुळे भाजण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी फराळ खाऊन पोट बिघडल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
दिवाळीतील तेलकट, मसालेदार फराळ, भरपूर मिठाई व पंचपक्वानाचे जेवण यामुळे पोट बिघडण्याचे प्रमाण वाढते. अ‍ॅसिडीटी, अपचन, जुलाब अशा तक्रारी या दिवसांत वाढतात. दरवर्षीप्रमाणे यावेळीही पोटदुखीच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये ३० ते ३५ टक्के रुग्ण हे फराळामुळे झालेल्या पोटदुखीचे आहेत. त्याचवेळी फटाक्यांच्या धुरामुळे खोकला, सर्दी होत असलेले रुग्णही उपचारांसाठी येत आहेत, असे अंधेरी येथील फॅमिली डॉक्टर सुहास पटवर्धन यांनी सांगितले. यावेळी फटाक्यांमुळे भाजल्याचे, जखमी झाल्याचे प्रमाण कमी असल्याचे ते म्हणाले.  
तापमानाचाही परिणाम
पहाटे गारवा आणि दुपारी कडक उन्ह असे वातावरण सध्या आहे. त्यातच कमाल तापमानातही चढउतार होत आहेत. गेल्या आठवडय़ात कमाल तापमान ३३ – ३४ अंश से. दरम्यान होते. सोमवारी ३६.२ अंश से. तर मंगळवारी ३५.३ अंश से. तापमान नोंदले गेले.  या चढउतारांमुळेही विषाणूंच्या वाढीला पोषक वातावरण मिळते. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला यांचे प्रमाण वाढते.
फटाक्यांची मजा आणि सजा
फटाक्यांबाबत धोक्याच्या सूचना देऊनही त्या पाळल्या जात नसल्याने अनेक मुंबईकरांवर भर दिवाळीत रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली. केईएममध्ये दिवाळीच्या दिवसांत २१ जणांना दाखल करण्यात आले. त्यातील तिघांच्या डोळ्याला जखमा झाल्या असून इतरांना उपचार करून सोडण्यात आले. शी रुग्णालयात गेल्या चार दिवसांत ४० रुग्ण उपचारांसाठी आले. त्यातील ३५ जणांना किरकोळ जखमा झाल्या असून पाच जणांना दाखल करून घेण्यात आले आहे.