दिल्लीतल्या मरकजमुळे राज्यातही करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याच्या धास्तीने सरकारची झोप उडाली आहे. त्यामुळे राज्यात कोणत्याही जाती धर्माचे सण, उत्सव, मेळावे होणार नाही याची खबरदारी घ्या. करोनाचे संकट संपेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही निमित्ताने गर्दी होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्या. त्यासाठी तुमच्या अधिकारांचा वापर करा अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी लोकांना घरातच रोखण्यासाठी पोलिस, प्रशासनास कारवाईची मोकळीक दिली. मरकजमधील सहभागी व्यक्तींनी तातडीने पुढे येऊन आपल्या तपासणीसाठी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्र्यांनी  व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे  विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी  संवाद साधत करोनाच्या प्रतिबंधासाठी के ल्या जात असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेताना हे आदेश दिले. संशयित करोना  बाधितांच्या विलगीकरणाचे पालन झालेच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर गर्दी दिसता कामा नये. नागरिकांच्या सुविधेसाठी २४ तास दुकाने उघडी ठेवली आहेत मात्र काही ठिकाणी लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत. भाजीबाजारांमध्ये सुद्धा सुसूत्रता आणणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी चिंचोळ्या गल्लय़ा आहेत,त्यामुळे देखील गर्दी वाढते. एकतर तेथील बाजार दुसरीकडे मोकळ्या जागेवर हलवा किंवा वेळा ठरवून द्या. तुमच्या अधिकारांचा वापर करून लोकांना शिस्त लावा असे सांगत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना कठोर कारवाईची मोकळीक दिली.

आरोग्य, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, आणि कायदा व सुव्यवस्था अशा तीन आघाडय़ांवर प्रशासन आणि सरकारला लढावे लागत आहे. ज्याप्रमाणे आरोग्य यंत्रणा, पोलीस राबताताहेत त्याप्रमाणे राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि सर्व महसूल यंत्रणा २४ तास काम करते आहे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी महसूल यंत्रणेचे कौतूक के ले.

‘ज्येष्ठ नागरिकांना घरपोच वस्तू द्या’

करोनाच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील वयोवृद्ध, अपंग आणि एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तू  घरपोच देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. वयोवृद्ध, अपंग किंवा एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना घराच्या बाहेर पडावे लागू नये तसेच त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने ही योजना राबविण्यात येणार आहे.त्यासाठी एक हेल्पलाईन तयार करण्यात आली असून मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी १८०० २२१ २९२ ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.  ती सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहतील.  या मोहिमेसाठी राज्य समन्वयक म्हणून शासनाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे काम पाहणार आहेत.