News Flash

“मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व खासगी व सरकारी रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करा”

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिकांना निर्देश

मुंबई महानगर क्षेत्रातीलमधील सर्व महानगरपालिकांच्या अखत्यारीतील सरकारी आणि खासगी रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करण्याचे निर्देश आज(मंगळवार) नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आगीच्या घटना टाळण्यासाठी हे ऑडिट त्रयस्थ तज्ज्ञ संस्थेच्या माध्यमातून करण्याचे त्यांनी सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांना सांगितले आहे.

एमएमआर क्षेत्रातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज नगरविकास मंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत दुरदृष्य प्रणालीद्वारे बैठक झाली. यावेळी ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. ऑक्सिजन, रेमडेसिवीर उपलब्धतेचा आढावाही घेण्यात आला. त्यासोबतच होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांच्या तब्येतीची माहिती मिळवण्यासाठी कॉल सेंटरचा प्रभावी वापर करण्याची सूचना शिंदे यांनी केली.

उन्हाळा सुरु झाल्याने वातानुकूलित यंत्र आणि व्हेंटिलेटर यामुळे अतिरिक्त वीज वापरली जाते. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आगी लागण्याची शक्यता असल्याने कोविड केअर सेंटरच्या ठिकाणी अग्निशमन दलाचे वाहन तैनात करण्याची सूचना शिंदे यांनी केली. यासोबतच अनेकदा खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्याच्या घटना टाळण्यासाठी सहायक आयुक्त आणि वॉर्ड ऑफिसर यांच्या मदतीने या ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष ठेवणे आणि ऑक्सिजन कमी होताच पालिकेला कळवणे बंधनकारक करण्याची सूचनाही त्यांनी केली. तसेच कोविड केअर सेंटर मधील महिला रुग्णांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्ष राहण्याचे आदेश देखील शिंदे यांनी दिले आहेत.

काही महानगरपालिकांच्या भागातील करोना रुग्णांची संख्या घटत असल्याचे निरीक्षण काही महापालिका आयुक्तांनी नोंदवले. मात्र तरीही ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे काम शक्य तेवढ्या लवकर पूर्ण करून कार्यान्वित करण्याचे निर्देश देखील नगरविकास मंत्र्यांनी सर्व आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 9:03 pm

Web Title: do fire structural and oxygen audit of all private and government hospitals in mumbai eknath shinde msr 87
Next Stories
1 मुंबईत पुन्हा करोना संसर्ग वाढण्याची भीती!; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
2 Anand Mahindra : “वो कोई और चिराग होते है…” आनंद महिंद्रांचा लाखो आरोग्य सेवकांना शायरीतून सलाम!
3 “..तर उद्या पुन्हा माझी ब्रेकिंग न्यूज होईल!” मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावर अजितदादांनी हाणला टोला!
Just Now!
X