मुलांनो मैदानात दररोज एक तास भरपूर खेळा आणि भरपूर वाचन करा, असा संदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुलुंडमधील ‘सौ. लक्ष्मीबाई इंग्लिश मीडियम स्कूल’मधील विद्यार्थ्यांना दिला. शाळेने नुकतेच शिक्षणमंत्र्यांशी आपल्या विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आला. त्या वेळी तावडे यांनी विद्यार्थ्यांशी मनसोक्त गप्पा मारल्या.
या वेळी विद्यार्थ्यांनी मंत्र्यांना त्यांचे आवडते पुस्तक, लेखक, त्यांची शाळा इथपासून ते स्वसंरक्षण या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश असावा का, दप्तराचे ओझे कधी कमी करणार, राजकारणात करिअर करण्यासाठी काय करता येईल असे विविधांगी प्रश्न विचारले. तावडे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तर दिले. दररोज मैदानावर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्यात येणार असल्याच्या आपल्या घोषणेचा त्यांनी या वेळी पुनरुच्चार करत शालेय जीवनातील मैदानी शेळाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी त्यांच्यासोबत ‘सेल्फी’ही काढले.
विद्यार्थ्यांबरोबरच पालकांशीही संवाद साधताना त्यांनी ‘पालकांनी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे. त्यांच्याशी सुसंवाद साधणे आवश्यक आहे. तसेच, बदलत्या काळात पालकांनी डिजिटल साक्षर व्हावे,’ असा मोलाचा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे प्रास्तविक वैशाली सरवणकर यांनी तर सूत्रसंचालन मुख्याध्यापिका पूजा कुलकर्णी यांनी केले. या वेळी संस्थेचे प्रसाद कुलकर्णी, संस्थापिका जयश्री कुलकर्णी, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, मीनाक्षी पाटील, समिता कांबळे, प्रभाकर शिंदे, शिक्षणाधिकारी डी. एम. पोखरणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
संगणकावर पेपर लिहिता येईल का?
शाळेत शिकणाऱ्या सिमरन जोशी या अंध विद्यार्थिनीने ‘आपल्याला संगणकावर पेपर लिहिण्याची परवानगी मिळेल काय’ असा प्रश्न विचारून अंध विद्यार्थ्यांच्या लेखनिकाच्या प्रश्नाला वाट करून दिली. तिच्या प्रश्नाची दखल घेत त्यांनी यासाठी आपण जरूर प्रयत्न करू, असे आश्वासन तिला दिले. खाऊचे पैसे दुष्काळग्रस्तांना शाळेच्या विद्यार्थ्यांनी खाऊचे पैसे जमा करून दुष्काळग्रस्तांच्या निधीकरिता २५ हजार रुपये या वेळी शिक्षणमंत्र्यांच्या हाती सुपूर्द केले.