इमारत कोसळली आणि सारे काही गमावले.. २५ वर्षांची कमाई धुळीला मिळाली.. गमावलेल्या आप्तांचे दु:ख आयुष्यभर उराशी बाळगत जगणे नशिबी आले.. पालिकेकडून मिळालेली मदत संसार उभा करण्यासाठी तुटपुंजी ठरली.. शून्यातून उभे राहण्याची उमेदच ते सारेजण हरवून बसले आहेत.. ही अवस्था आहे डॉकयार्ड येथील कोसळलेल्या इमारतीमधील कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांची. पालिकेने दिलेले घर निवृत्तीनंतर हिरावून घेऊ नये, असे आर्जव ते करीत आहेत.
डॉकयार्डच्या बाबू गेनू मंडईजवळ २७ सप्टेंबर रोजी भल्या पहाटे कानठळ्या बसविणारा आवाज झाला आणि धुळीचे लोट उठले. पालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीची इमारत जमीनदोस्त झाल्याचे दिसताच हलकल्लोळ उडाला. पालिकेच्या १० कामगारांसह ६० जण मृत्युमुखी पडले. तर ४ कामगारांसह ३३ जण जखमी झाले. पालिकेने जाहीर केलेली मदतही मृतांच्या नातेवाईकांना तातडीने देऊन टाकली.
दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील २१ सदनिका पालिकेने कामगारांना दिल्या होत्या. पण त्यापैकी तीन कामगारांच्या सदनिकांमध्ये त्यांचे नातेवाईक राहात असल्याचे स्पषअट झाले आहे. दुर्घटनाग्रस्त १२ कुटुंबियांना घाटकोपरमधील पंतनगरातील रायगड चौकाजवळील जनता सोसायटी मार्ग येथील श्री साई जेठाबाई कृपा बिल्डिंग क्रमांक ३ मध्ये घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. परंतु केवळ पाच कुटुंबेच तेथे राहावायास गेली आहेत. उर्वरित कामगार आणि त्यांचे कुटुंब अद्याप आपल्या नातेवाईकांच्या आश्रयाला आहेत. या दुर्घटनेला एक महिना पूर्ण झाल्यानंतरही उर्वरित सहा कामगारांच्या बाबतीत कोणताच निर्णय झालेला नाही.
पालिकेने नुकसानभरपाईची रक्कम आणि घरे दिली, पण वाचलेले कामगार आणि त्यांचे कुटुंबीय धक्क्य़ातून अद्याप सावरलेले नाहीत. इमाने इतबारे पालिकेची नोकरी केली. काटकसर करुन एकेक वस्तू खरेदी करुन संसार उभा केला आणि एका क्षणात सर्व काही मातीला मिळाले. अंगावरच्या कपडय़ानिशी कामगार आणि त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले. पालिकेकडून मिळालेले घर आणि मदत एवढीच काय ती पुंजी आज त्यांच्या जवळ आहे.
खिन्न मनाने जगत असलेल्या या कामगारांना नव्या उमेदीने उभे राहण्यासाठी चार-पाच वर्षे लागतील. मुंबईत घराच्या किमती गगनाला भिडल्यामुळे उरलेल्या आयुष्यात नोकरी करुन घर घेणे शक्यच नाही. त्यामुळे पालिकेने आता दिलेले घर निवृत्तीनंतर हिरावून घेऊ नये, अशी विनंती हे कामगार करीत आहेत.