संदीप आचार्य, लोकसत्ता
गेल्या काही दिवसात करोनाचे रुग्ण वेगाने वाढताना दिसत आहेत. याला लोक तसेच राजकारणी जबाबदार आहेत. राजकीय मेळावे, लग्नसमारंभ तसेच बहुतेक सर्वत्र लोक मास्क वापरत नाहीत की सुरक्षित अंतर ठेवताना दिसतात. परिस्थिती अशीच राहिली तर करोनाची लाट नव्हे तर लाटा येतील, असा इशारा राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी दिला आहे. अशाच प्रकारची चिंता आरोग्य क्षेत्रातील ज्येष्ठ डॉक्टरांनीही व्यक्त केली आहे.

“ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी प्रचंड धुरळा उडवला. त्यासाठी राजकीय पक्षांनी जागोजागी मेळावे घेतले. निवडणूक निकालानंतर तर जल्लोष सुरु होता. या सर्वात कुठेही सुरक्षित अंतर वा मास्क वापरण्याचे पालन झाले नव्हते. याशिवाय लग्नसमारंभ तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमात सरकारने लागू केलेल्या कोणत्याही नियमांचे पालन होताना दिसत नाही. मुंबईत लोकल प्रवास सर्वांसाठी सुरु झाला आहे. मंदिरापासून हॉटेल व बार रेस्तराँ जोरात सुरु आहेत. यातूनच पुन्हा करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. एका रुग्णामागे संपर्कातील २० लोकांना शोधण्याचे आदेश सरकारने जारी केले. त्याचेही कुठे पालन होताना दिसत नाही. आम्ही राज्य कृती दल म्हणून या सर्व बाबी सरकारच्या निदर्शनास आणल्या आहेत. यावर कठोर कारवाई केली नाही तर करोनाची दुसरी लाट आल्याशिवाय राहाणार नाही,” असे डॉ. संजय ओक यांनी सांगितले. युरोपमधील अनेक देश असेच बेसावध राहिले आणि त्यांना त्याची किंमत मोजावी लागली. यातील बहुतेक देशांनी पुन्हा लॉकडाउन जारी केला. महाराष्ट्रातही लोकांनी काळजी घेतली नाही तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याकडे डॉ. ओक यांनी लक्ष वेधले.

“ज्या प्रमाणात लसीकरण व्हायला हवे तेवढे ते होत नाही हे दुर्दैवी आहे. आरोग्य क्षेत्रातील लोकांमध्ये अवघे ५५ टक्के लसीकरण झाले हे चुकीचे तर आहेच परंतु यातून चुकीचा संदेश गेल्याचे,” डॉ ओक म्हणाले. “लसीकरणाबाबत धरसोड धोरण असता कामा नये तसेच सर्वांना लस लवकरात लवकर उपलब्ध करून दिली पाहिजे. सरकारचे यावरील नियंत्रण उठवून खाजगी क्षेत्राच्या ताब्यात लसीकरण दिले पाहिजे,” असेही डॉ संजय ओक यांनी सांगितले.

“करोना हा यापुढेही राहाणार असून आपण योग्य काळजी घेतली नाही तर लाट येऊ शकते,” असा इशारा टास्क फोर्सचे सदस्य व विख्यात मधुमेहतज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी दिला. “करोनाचे रुग्ण राज्याच्या ग्रामीण भागात वाढताना दिसतात तर मुंबईत सरासरी ५०० रुग्ण रोज आढळून येत आहेत. याचा अर्थ करोनाने ‘पिवळा’ दिवा दाखवला आहे तो ‘लाल’ होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. यासाठी दुहेरी मास्क वापरा तसेच सुरक्षित अंतर आवश्यक असल्याचे,” डॉ शशांक जोशी यांनी सांगितले.

“देशात केरळ पाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक करोना रुग्ण आढळून आले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीपासून लग्नसमारंभ आदी सार्वजनिक कार्यक्रमात योग्य काळजी घेतली नाही याचे हे परिणाम आहेत. सरकारने आता कडक भूमिका घेतली पाहिजे. जिथे काळजी घेतली जात नसेल तिथे किमान पार्शल लॉकडाऊन करावा तसेच सरकाने पन्नाशीपुढील लोकांसाठी लसीकरणाला प्राधान्य द्यावे,” असेही डॉ. जोशी म्हणाले. “लोकच जर काळजी घेणार नसतील तर तो करोना तरी काय करेल,” असा उपरोधिक सवाल मुंबई महापालिकेच्या शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी उपस्थित केला. “करोना कोणालाच बघत नाही आणि सोडतही नाही हे राजकारणी लोकांनीही लक्षात घेतले पाहिजे. समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांकडे जनतेचे लक्ष असते, त्यामुळे नेते जसे वागतात तसे कार्यकर्ते व जनता वागते,” असा टोलाही डॉ. मोहन जोशी यांनी लगावला.

राज्यात बुधवारी ४७८७ नवीन करोना रुग्ण आढळून आले असून विदर्भ व मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या जास्त दिसते. एकूण २१ जिल्ह्यात करोना रुग्ण गेल्या आठवड्यात वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मागच्या तीन आठवड्यापूर्वी सरासरी २४९८ रुग्ण आढळून आले होते. २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान २६४६ रुग्ण, ३ त ९ फेब्रुवारी दरम्यान २९६७ रुग्ण आढळले तर १० ते १५ फेब्रुवारी दरम्यान ३५८१ रुग्ण आढळून आले आहेत. काल १७ फेब्रुवारी रोजी राज्यात ४७८७ नवीन करोना रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईतही बोरीवली, जोगेश्वरी, अंधेरी आणि चेंबूरमध्ये रुग्णसंख्या वाढली असून मास्क न वापरणार्यांवर तसेच सुरक्षित अंतर न ठेवणार्यांवर कारवाईचा कोणताही चाप नसल्याने हे रुग्ण वाढत चालले असून परिस्थिती कठोरपणे हाताळली नाही तर करोनाची दुसरी लाट टाळता येणार नाही, असे आरोग्य क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.