कल्याण आणि डोंबिवली या शहरांचा विचका झाला असताना नवीन २७ गावांचा महापालिकेत समावेश करून या गावांचे भले होणार नाही. त्यामुळे ही गावे स्वतंत्र ठेवलेली बरी, असे मत ठाकरे यांनी आज व्यक्त केले. राज करे यांनी आज डोंबिवलीत पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राज यांनी दादरी प्रकरणावरही भाष्य केले. दादरीसारख्या घटना या पद्धतशीर घडवल्या जात आहेत. सत्ता राखण्यासाठी येत्या काळात दंगली घडवल्या जातील आणि कदाचित एखादं छोटं युद्धही छेडलं जाईल, असा आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाजपवर केला आहे. तसेच, दिघ्यातील नागरिकांची फसवणूक झाली असून, तेथे सुरू असलेली पाडापाडीची कारवाई चुकीची आहे. ज्यांनी सर्वसामान्य नागरिकांना फसविले त्या बिल्डर, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यावर कारवाई का केली जात नाही? कॅम्पाकोलासाठी वेगळा आणि दिघ्याला वेगळा न्याय का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, शिवसेनेने गुलाम अलींच्या कार्यक्रमाला केलेल्या विरोधाच्या भूमिकेला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, गुलाम अली खूप मोठे गायक आहेत, त्यात वाद नाही पण आपल्या देशातही चांगले कलाकार आहेत. पाकिस्तानने नेहमी कुरापती काढायच्या आणि आपण मात्र नेहमी हात पुढे करणार, हे चुकीचं आहे. लता मंगेशकर यांच्यासारख्या ज्येष्ठ गायिकेलाही तिथे कार्यक्रम करू दिला जात नाही, जगजित सिंग यांचा कार्यक्रमही उधळून लावला होता. कोणत्याही कलेला माझा विरोध नाही पण भारतीय कलाकारांचा कार्यक्रम पाकिस्तानमध्ये होऊ दिला जात नाही, मग आपण का बोलावतो ? असे म्हणत पाकिस्तानी कलाकारांनी भारतात येऊन आपली कला सादर करू नये, असे मत राज यांनी व्यक्त केले.
संग्रहित लेख, दिनांक 10th Oct 2015 रोजी प्रकाशित
कल्याण-डोंबिवली निवडणूक २७ गावांना वगळूनच व्हावी – राज ठाकरे
नवीन २७ गावांचा महापालिकेत समावेश करून या गावांचे भले होणार नाही.
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:

First published on: 10-10-2015 at 14:14 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont include those 27 villages in kalyan dombivali election says raj thackeray