राज्यातील २७ महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षणाच्या सोडती आज नगरविकास विभागाकडून जाहीर करण्यात आल्या. प्रधान सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली या सोडती काढण्यात आल्या. महापौरांचे सहसचिव जाधव तसेच महापालिका पदाधिकाऱ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून महापौरपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. विशेषत: प्रवर्गातील महिला आरक्षणाच्या सोडती महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते काढण्यात आल्या.

ही सोडत काढताना सुरुवातीला आरक्षण सोडतीबाबतच्या तरतुदी सांगण्यात आल्या. आरक्षण सोडत नियम २०१७ मधील तरतुदीनुसार या सोडती काढण्यात आल्या. अनुसूचित जमातीचे आरक्षण सोडत काढताना २००७ पासून अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या महानगरपालिकांना या सोडतीतून वगळण्यात आले. तसेच इतर संवर्गासाठी आरक्षण सोडत काढताना सध्या त्या संवर्गाचे आरक्षण असलेल्या महापालिकांना वगळण्यात येऊन अन्य महापालिकांतून आरक्षण काढण्यात आले.

विविध प्रवर्ग आणि त्यासाठी महापौरपदे आरक्षित झालेल्या महापालिका पुढीलप्रमाणे…

  • अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : वसई- विरार
  • अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : मीरा- भाईंदर
  • अनुसूचित जाती (महिला) : अहमदनगर, परभणी
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) : लातूर, धुळे, अमरावती</li>
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : नांदेड-वाघाळा, सोलापूर, कोल्हापूर, मालेगाव
  • खुला (सर्वसाधारण) : बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली, सांगली, उल्हासनगर
  • खुला (महिला) : नवी मुंबई, जळगाव, भिवंडी, अकोला, पनवेल, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, चंद्रपूर