मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हीच सरकारची भुमिका आहे. आरक्षणाबाबत सरकारची भुमिका स्पष्ट आहे. तीच भुमिका आम्ही न्यायालयात तत्परतेने मांडणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठासून सांगितले. तसेच मुठभर लोकांच्या स्वार्थामुळे समाजाला वेठीस धरण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांच्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. सरकारने विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या विविध शैक्षणिक निर्णयांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाबाबत त्यांनी सरकारची भुमिका मांडली.
मराठा आरक्षणाबाबत सरकार प्रामाणिक असल्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी दिली. तसेच उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले नसल्याचा दावाही केला. आरक्षणाबाबत याचिकाकर्त्यांची संख्या मोठी आहे. त्यांनी वेळ वाढवून मागितल्याने न्यायालयाने पुढील तारीख दिल्याचे त्यांनी म्हटले.
राज्यात सध्या विविध समाजात असंतोषाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुठभर लोकांमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. त्यामुळे समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. शाहु-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत अशी अपेक्षा व्यक्त करत एका समाजाने दुसऱ्या समाजाविरूद्ध भुमिका घेऊ नये असे आवाहनही केले. अॅट्रॉसिटी दुरूपयोगाबाबत सर्व नेत्यांशी चर्चा होत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.