पुण्यातील जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) शुक्रवारी सुमारे साडेसहा तास चौकशी करण्यात आली.
खडसे यांना पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीन खरेदीप्रकरणी ३० डिसेंबरला हजर राहण्याचे समन्स ईडीने बजावले होते. त्यासाठी खडसे जळगावहून मुंबईला दाखल झाल्यावर त्यांना करोना झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे १५ दिवस वैद्यकीय उपचार व विलगीकरणात राहिल्यानंतर खडसे शुक्रवारी सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. त्यांची मुलगी शारदाही त्यांच्याबरोबर होती.
खडसे यांनी कुटुंबीयांच्या नावे भोसरी एमआयडीसीत जमीन खरेदीप्रकरणी याआधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे व नाशिक येथील अधिकाऱ्यांनी, प्राप्तिकर खात्याने आणि माजी न्यायमूर्ती डी. एस. झोटिंग यांच्या समितीकडूनही चौकशी करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी या जमीन खरेदीबरोबरच खडसे यांच्या अन्य मालमत्तांबाबतही तक्रार केली असून ईडीला कागदपत्रे दिली आहेत. त्यामुळे यासंदर्भातही चौकशीत प्रश्न विचारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 16, 2021 12:42 am