पूर्व द्रुतगती मार्गावरील अंधेरी-घाटकोपर जंक्शन येथील वाहतूक कोंडी कमी होणार

मुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावरील अंधेरी-घाटकोपर जंक्शन येथील मुंबईकडे जाणारा उड्डाणपूल सोमवारी वाहतुकीस खुला करण्यात आला. या उड्डाणपुलाची दक्षिण बाजू खुली झाल्यामुळे या ठिकाणी नेहमी होणारी वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

पर्यावरण आणि पर्यटनमंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांच्या उपस्थितीत या उड्डाणपुलाचे उद्घाटन सोमवारी सकाळी झाले. उड्डाणपुलाचा खर्च ३३.०४ कोटी रुपये असून रुंदी १२ मीटर आणि लांबी ६९३ मीटर आहे.

पूर्व द्रुतगती मार्गाने मुंबईहून ठाण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी अंधेरी-घाटकोपर जंक्शन येथे तीन मार्गिकांचा एकदिशा उड्डाणपूल आहे. मात्र मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा नसल्याने या उड्डाणपुलाजवळ कायमच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असे. त्यासाठी मुंबईच्या दिशेने तीन मार्गिकांच्या उड्डाणपुलाचे काम मे २०१८ मध्ये सुरू करण्यात आले होते. अडीच वर्षांनंतर हे रखडलेले काम पूर्ण होऊन अखेरीस हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला झाला.

या वेळी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव म्हणाले की, ‘पूर्व द्रुतगती महामार्गावरील सध्याचे अंधेरी-घाटकोपर जंक्शन हे सर्वात जास्त वाहतूक वर्दळीच्या स्थानापैकी एक आहे. नवीन उड्डाणपुलामुळे ही वाहतूक विभागली जाईल आणि त्यामुळे जंक्शनवरील वाहतुकीची कोंडी कमी होईल.’

वाहतूक कोंडीला आळा

टाळेबंदी शिथिलीकरणात अद्याप उपनगरी रेल्वेचा प्रवास सर्वासाठी खुला झाला नसल्याने गेल्या चार महिन्यांपासून रस्त्यावरील वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. पूर्व द्रुतगती मार्गावर मुलुंडनंतर विक्रोळीपर्यंतचा प्रवास अत्यंत वेगात होत असे. मात्र अंधेरी-घाटकोपर जंक्शन येथे उड्डापुलाच्या कामामुळे मुख्य रस्त्यावरील केवळ एकच मार्गिका वापरता येत असे. परिणामी गेल्या चार महिन्यांत या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असे. घाटकोपर येथील उड्डाणपुलामुळे येथील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. मात्र त्याच वेळी उड्डापुलावरून मुंबईच्या दिशेने जाताना रमाबाई नगर येथे मोठय़ा प्रमाणात मेट्रोचे काम सुरू असल्याने पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.