म्हाडाकडून ३८९४ विजेत्यांना प्रथम सूचनापत्र जारी

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मार्च २०२० मध्ये ३८९४ घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. पण या सोडतीतील घरांच्या वितरणाला देखरेख समितीची स्थगिती असल्याने सोडतीनंतरची प्रक्रिया ठप्प होती. पण आता मात्र मंडळाने या विजेत्यांना प्रथम सूचना पत्र पाठवून कागदपत्रे जमा करून घेण्यास सुरुवात केली असून  विजेत्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

बॉम्बे डाईंग टेक्सटाईल मिल, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलच्या जागांवर उभारण्यात आलेल्या ३ हजार ८९४ घरांसाठी मार्च २०२० मध्ये सोडत काढण्यात आली होती. सोडत झाल्यानंतर विजेत्यांच्या पात्रता निश्चितीच्या प्रक्रियेला सुरुवात  होणे अपेक्षित होते. मात्र सोडत झाल्यानंतर काही दिवसांतच न्यायालयाने स्थापन केलेल्या देखरेख समितीने सोडतीला स्थगिती दिली. त्यामुळे वर्षभरात पुढील कोणतीही प्रक्रिया होऊ शकली नव्हती.

दरम्यान विजते कामगार मात्र प्रथम सूचना पत्र कधी मिळेल आणि कागदपत्रे कधी जमा करून घेतली जातील याच्या प्रतीक्षेत होते. अखेर त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. सर्व विजेत्यांना प्रथम सूचना पत्र पाठवण्यात येत आहे. अनेक विजेत्यांना पत्र मिळाले असून आता ते कागदपत्रे जमा करत असल्याची माहिती मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

देखरेख समितीची घरांच्या वितरणाला स्थगिती आहे. तर ही स्थगिती उठवावी अशी मागणी मंडळाकडून देखरेख समितीला करण्यात आली आहे. यावर अजून निर्णय झालेला नाही. दरम्यान सोडत काढून दीड वर्ष होत असून बराच वेळ वाया जात आहे. तर पात्रता निश्चितीच्या प्रक्रियेला बराच वेळ लागतो. त्यामुळे देखरेख समितीचा पुढील आदेश येईपर्यंत आम्ही पात्रता निश्चितीचे काम पूर्ण करून घेत आहोत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

घरांच्या वितरणाला स्थगिती असून आम्ही कुठेही घराचे वितरण करत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पण सोडतीनंतरची प्रक्रिया सुरू झाल्याने विजेते खूश झाले आहेत.