News Flash

करोनाच्या भीतीपेक्षा रोजगार महत्त्वाचा

मुंबईत परतलेल्या कामगारांची मानसिकता

संग्रहित छायाचित्र

सुहास जोशी/अमर सदाशिव शैला

हाताला काम नाही, खिशात पैसे नाहीत आणि करोनाची भीती अशा परिस्थितीत मुंबई सोडून गेलेले स्थलांतरित कामगार रोजगार मिळू लागल्यावर परतू लागले आहेत. करोनाच्या भीतीपेक्षा रोजगार महत्त्वाचा आहे, अशी त्यांची भावना आहे.

टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात रोजगारासाठीची परवड वाढल्यावर हजारो स्थलांतरित कामगारांनी मिळेल त्या वाहनाने गाव गाठले. मात्र आता ‘अनलॉक’च्या प्रक्रियेत काही व्यवहार पूर्ववत होऊ लागल्याने अनेक कंत्राटदारांनी या कामगारांना आपणहून बोलवायला सुरुवात केली आहे. परिणामी उत्तर भारतातून रोज मुंबईत येणाऱ्या गाडय़ांमध्ये या मजुरांचीच गर्दी दिसत आहे.  या कामगार आणि कारागिरांमध्ये विशेष कला अवगत असणाऱ्यांपासून ते बिगारी काम करणाऱ्यांपर्यंत सर्वाचाच समावेश असल्याचे दिसते. या मजुरांशी संवाद साधला असता, त्यांना रोजगाराचीच आवश्यकता असल्याचे ठळकपणे निदर्शनास आले. ‘करोनाची भीती वाटत नाही का?’ या प्रश्नावर ते सांगतात की, मालकांनीच तिकीट काढून दिले, मग लगेचच निघालो.

विशी-पंचविशीतला शत्रोहन कश्यप उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्य़ातील आपल्या गावी परत गेला होता; पण ‘गावात काम नाही, तिथे उपाशी मरण्यापेक्षा कामासाठी मुंबईत येणे भागच आहे. मालकानेच तिकीट काढून दिल्याने येण्यात अडचण नव्हती,’ असे शत्रोहन याने सांगितले. गावात खात्रीशीर रोजगार नाही, त्यापेक्षा येथे १५ हजार मिळतात, असे शत्रोहनच्या गावातील १२ जणांच्या चमूने सांगितले. दक्षिण मुंबईतील दारुखाना भागातील फर्निचरच्या कारखान्यात ते काम करतात आणि त्यांची राहण्याची सोयही तेथेच आहे.

मेट्रोचे काम पुन्हा सुरू झाल्याने कंत्राटदार कामगारांना बोलावत आहेत. कामगारांकडे असलेले कौशल्य आणि त्याला साजेशा रोजगाराच्या मर्यादित संधी यामुळे हे कामगार मुंबईत परतू लागले आहेत. मेट्रोच्या कामावरील सिव्हिल फोरमन नीरज यादव दीड महिन्यांतच गावाहून परत आला. गावाकडे रोजगार म्हणजे शेतात मजुरी. मजुरी एवढी कमी आहे की त्यावर घर चालणे कठीण.

मुंबईतील कंत्राटदार मालकाने स्वत:हून फोन करून बोलवले. तिकीटदेखील काढून दिले. त्यामुळे परत आलो, असे बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्य़ातून परत आलेल्या धंजोय कुमार याने सांगितले. तो ठाण्यातील एका मेटल कंपनीत काम करतो.

कामाच्या ठिकाणीच निवारा

परतलेल्या मजुरांच्या हातावर रेल्वे स्थानकातच अलगीकरणाचे शिक्के मारले जातात. येणाऱ्या बहुतांश कामगारांची कामाच्या ठिकाणीच राहण्याची व्यवस्था असते. कामाच्या ठिकाणीच आमची निवाऱ्याची व्यवस्था आहे, असे काही कामगारांनी सांगितले; परंतु अशी व्यवस्था नसलेले कामगार खरोखर विलगीकरणात राहतात का, असा प्रश्न आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 12:23 am

Web Title: employment is more important than coronas fears abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 प्रत्येक जिल्ह्यात करोना चाचणी प्रयोगशाळा
2 खासगी कर्मचाऱ्यांच्या सामूहिक चाचण्या
3 विद्यापीठाचे ८ कर्मचारी करोनाबाधित, ७० कर्मचाऱ्यांचे विलगीकरण
Just Now!
X