करोनाच्या साथीला रोखण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांवरील गर्दी टाळण्यासाठी किराणा दुकाने, औषधांची दुकाने २४ तास खुली ठेवण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी जाहीर केला आहे.

करोना उपयाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षां या सरकारी निवासस्थानी घेतली.  जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होत असल्याने लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. दुकानांवरील वेळेची मर्यादा रद्द केल्यास लोकांना वस्तू मिळण्याची खात्री राहील. तसे झाल्यास गर्दी होणार नाही. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य, औषधे खरेदी करण्यासाठी ही दुकाने २४ तास खुली ठेवण्याची मुभा दुकानदारांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, र्निजतुकीकरण, स्वच्छता या बाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्या लागतील.

निर्णय का?

देशभरात तीन आठवडय़ांसाठी टाळेबंदीचा निर्णय जाहीर झाला आहे. मात्र त्यात जीवनावश्यक वस्तूंना वगळले असल्याने अन्नधान्य, भाजीपाला, दूध, औषधे आदी घेण्यासाठी  लोकांना बाहेर पडावे लागत आहे. अनेक ठिकाणी सकाळी व संध्याकाळी त्यासाठी गर्दी होत असल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर हा प्रश्न सोडवण्यासाठी निर्णय घेण्यात आला.

घरपोच व्यवस्था राबवा

मुंबई : किराणा माल-भाजीपाला यासारख्या जीवनावश्यक वस्तूंसाठी आपल्या गृहनिर्माण सोसायटीमधील रहिवाशांना रस्त्यावर गर्दी करावी लागू नये यासाठी या वस्तूंची सदस्यनिहाय यादी करून ती जवळच्या पुरवठादाराकडून प्रवेशद्वारावरच मागवावी आणि गर्दी होणार नाही अशी अंतर्गत वितरणाची व्यवस्था करावी, अशी सूचना मुंबई जिल्हा उपनिबंधकांनी गृहनिर्माण सोसायटय़ांच्या पदाधिकाऱ्यांना के ली आहे.