करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वेने गाडय़ांच्या डब्यांमध्ये विलगीकरण कक्ष उभारले खरे; मात्र या डब्यांचा आजपर्यंत वापरच झालेला नाही. वापराबाबत कोणताही निर्णय न झाल्याने हे डबे कारखाने, कार्यशाळेत ठेवण्यात आले आहेत.
मुंबईत पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या ४०० हून अधिक डब्यांचे विलगीकरण केंद्रात रूपांतर करण्यात आले आहे. दिल्लीत अशा डब्यांचा वापर सुरू झाल्याचे रेल्वेने सांगितले. मात्र, मुंबईत राज्य सरकारने मागणी न केल्याने या डब्यांचा वापर होऊ शकलेला नाही, असे रेल्वेतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
रेल्वेच्या या विलगीकरण डब्यांमध्ये १६ खाटा, वैद्यकीय उपकरणे, रक्त पुरवठा, व्हेंटिलेटर, प्रसाधनगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीही सोय होईल, या पद्धतीने बदल करण्यात आले होते. अशा ४०० डब्यांची निर्मिती रेल्वेने केली. दरम्यान कामगारांना परराज्यात सोडण्यासाठी गाडय़ांची संख्या वाढवण्यात आल्याने यातील काही डबे पुन्हा मेल-एक्स्प्रेस डब्यांत रुपांतरीत करण्यात आले. जसजशी श्रमिक गाडय़ांची संख्या कमी होत गेली, तसतसे हे डबे पुन्हा विलगीकरण डब्यांत रुपांतरीत झाले. पण, मागणीअभावी हे डबे सध्या कारखाने, कार्यशाळेत ठेवण्यात आले आहेत.
राज्य सरकारकडून विलगीकरण डब्यांच्या वापराबाबत मागणी करण्यात आलेली नसल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले. तर श्रमिक गाडय़ांचे प्रमाण आता कमी झाले असून ते डबे पुन्हा विलगीकरण डब्यांत रुपांतरीत केले आहेत. मात्र त्याचा वापर अद्यापही सुरू झालेला नाही, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.
पावसाळ्यात गैरसोय?
हे डबे रुग्णांच्या सोयीसाठी योग्य ठिकाणी उभे करता येतील. त्यासाठी सर्व उपाययोजनाही केल्या जातील, असा दावा रेल्वे अधिकारी करतात. मात्र, मुसळधार पावसामुळे रुळांवर पाणी साचले तर डब्यांचा वापर करणे गैरसोयीचे ठरेल. त्यात रेल्वे कारखाने, कार्यशाळांमध्येही पाणी साचते. त्यामुळे पावसाळ्यात त्यांचा कितपत वापर होईल, याबाबत शंका आहे.
दिल्लीत वापर
तीन दिवसांपूर्वीच दिल्ली सरकारने रेल्वे विलगीकरण डब्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला. प्रथम १० डब्यांतील १६० खाटा वापरण्यात येणार आहेत. रेल्वेच्या शकुर बस्ती स्थानकाच्या देखभाल आगारात हे डबे ठेवण्यात आले आहेत.