26 January 2020

News Flash

खाऊ खुशाल : प्रयोगशील इडलीघर

‘बालाजी इडली हाऊस’मध्ये इडलीचे तब्बल पंचवीस प्रकार मिळतात.

(संग्रहित छायाचित्र)

प्रशांत ननावरे

दक्षिण भारतीय पदार्थ म्हटलं की पहिलं नाव तोंडावर येतं ते म्हणजे ‘इडली’. हा एक असा पदार्थ आहे, जो अनेकांना सकाळच्या न्याहरीपासून ते दुपारी आणि रात्री जेवण म्हणूनही चालतो. धडधाकट माणसापासून ते आजारी माणसापर्यंत इडली सहसा कुणालाही वज्र्य नसते. मुंबईत तर हल्ली नाक्यानाक्यांवर मोठय़ा टोपांतून इडली विकणाऱ्या अण्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. लोकही आनंदाने मिटक्या मारत ते खात असतात. कारण खिशाला परवडणारा, भरपेट आणि आरोग्यासही चांगला असा हा सर्वगुणसंपन्न पर्याय आहे. पण आज आपण ज्या जागेविषयी जाणून घेणार आहोत त्यांनी इडलीचं रूपच पुरतं बदलून टाकलेलं आहे. इडलीला घेऊनही असे प्रयोग होऊ  शकतात, हे पाहून आणि चाखून पाहिल्यानंतर आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही.

‘बालाजी इडली हाऊस’मध्ये इडलीचे तब्बल पंचवीस प्रकार मिळतात. लोकांच्या खाण्याच्या बदललेल्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांनी हे सर्व प्रयोग केले आहेत. त्यामध्ये तमिळनाडूच्या चेट्टीनाडूपासून ते आंध्र प्रदेशच्या किनारी भागातील, मँगलोरची इडली गस्सी आणि केरळच्या अस्सल मलबारी तडका इडलीचा समावेश आहे. साध्या वाफवलेल्या इडल्यांपासून ते बालाजीचं खास इडली प्लॅटरही येथे मिळतं. ज्यामध्ये चार प्रकारच्या इडल्या असतात. इडलीच्या प्रत्येक प्रकारासोबत सांबार आणि दोन प्रकारच्या चटण्या सोबत दिल्या जातात. इथल्या मेन्यूचं वैशिष्टय़ म्हणजे इडलीच्या नावाखाली तो प्रकार कसा तयार केला जातो आणि त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी टाकल्या जातात याचंही वर्णन केलेलं आहे. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार पदार्थाची निवड करू शकता आणि जो प्रकार मागवताय त्याची पूर्वकल्पना आलेली असते.

इडली पोरीयल, महाबलीपुरम पुदिना इडली, आंध्र स्टाइल इडली चिली, मुरुकोल्लम्बू इडली, हैदराबादी करी इडली, कैमा इडली, म्हैसूर कोट्टी इडली, श्रीलंका स्टाइल स्टय़ु इडली, दिंडीगुल थलकपट्टू इडली, अचारी ओनियन मसाला इडली, ही काही नावं वानगीदाखल इथं देतोय. प्रत्येक प्रकारचा पोत, त्यात टाकल्या जाणाऱ्या गोष्टी, सुवास आणि चव वेगळी आहे, हे विशेष. उगाच नावात वेगळेपण हवं म्हणून त्यांचं नामकरण तसं करण्यात आलेलं नाही. प्रत्येक नावामागे गोष्ट आहे, हे तिथल्या वेटरशी बोलताना लक्षात येतं.

महत्त्वाचं म्हणजे हे इडलीपुराण इथंच संपत नाही. चायनीज फ्युजन इडली, इडली सिझलर्स आणि इडली वॉफेल्स असे कधीही न ऐकलेले मथळेही लक्ष वेधून घेतात. त्यामध्ये प्रत्येकात कमीत कमी चार ते पाच वेगवेगळे पर्याय आहेत. त्यामुळे या मेन्यूमधील सर्व प्रकारच्या इडल्या खाऊन पाहायचा निश्चय केला तरी दोन महिने सहज निघून जातील. वेगवेगळ्या प्रकारच्या इडल्यांना द्याव्या लागणाऱ्या फोडणीमुळे मेन्यू कार्डवरील उजव्या बाजूची तीन आकडी संख्या पाहून तुम्ही डोळे वटाराल; परंतु इथल्या कुठल्याही प्रकाराचं प्रमाण इतकं असतं की दोन माणसं सहज पोटभर खाऊ  शकतील. त्यामुळे किमतीकडे दुर्लक्ष करायला अजिबात हरकत नाही.

इडलीसोबतच वेगवेगळ्या प्रकारचे डोसे, उत्तप्पा, अप्पम, सूप, रसम वडा, दही वडा, दक्षिण भारतीय भाताचे प्रकार, भाजी-रोटी असेही पर्याय इथं उपलब्ध आहेत. तुमच्या आवडीने काहीही खा, पण शेवट मात्र फिल्टर कॉफीने करा, एवढंच सांगेन. खरं तर दक्षिण भारतात गेल्यावर तिथल्या हॉटेलांमध्ये यातील अनेक प्रकार सहज मिळतही असतील, पण वेगवेगळ्या राज्यांतील इडलीचे सर्वोत्तम प्रकार एकाच ठिकाणी खाण्याची संधी मुंबईकरांना उपलब्ध झाली असेल तर ती अजिबात सोडता कामा नये. कांदिवलीसोबतच घाटकोपरमध्येही त्यांची शाखा आहे.

बालाजी इडली हाऊस

कुठे – शॉप नं १ आणि २, पंचशील आर्केड, एक्स सेंट्रल मॉलसमोरच्या गल्लीत, अ‍ॅक्सिस बँकेजवळ, महावीरनगर, कांदिवली (पश्चिम), मुंबई- ४०००६७.

कधी – सोमवार ते रविवार सकाळी ९ ते रात्री ११ वाजेपर्यंत.

nanawareprashant@gmail.com

@nprashant

First Published on October 20, 2018 1:55 am

Web Title: experimental idli house
Next Stories
1 ऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ
2 राखीव प्रवर्गातील १५४ उपनिरीक्षकांच्या नियुक्त्या रोखल्याने असंतोष
3 गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा
Just Now!
X