मध्य, पश्चिम रेल्वेकडून आजपासून १२ नवीन सोयीसुविधा; हार्बर, ट्रान्स हार्बरवर २६ फेऱ्यांचे उद्घाटन; ठाण्यासह पाच ठिकाणी पादचारी पूल खुले

प्रवाशांचा उपनगरीय रेल्वेप्रवास अधिक सुखकर करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त निवडला आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर येत्या ३१ जानेवारीपासून २६ नवीन लोकल फेऱ्यांना सुरुवात होणार आहे. तसेच गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेली नेरळ-माथेरान गाडीही शुक्रवारपासून सुरू होणार आहे. या दोन्ही महत्त्वाच्या सुविधांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. याखेरीज ठाणे, लोकमान्य टिळक टर्मिनस, सांताक्रूझसह पाच ठिकाणचे नवे पादचारी पूल आजपासून प्रवाशांच्या सेवेत येत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १८ वर शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील १२ सेवा-सुविधांचे उद्घाटन होणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, नेरळ, टिळक नगर आणि सांताक्रूझ स्थानकात  पादचारी पूल उभारण्यात आले आहेत. या पुलांचे उद्घाटन करून ते प्रवाशांच्या सेवेत येतील. तर विद्याविहार स्थानकातील पादचारी पुलाला अतिरिक्त पायऱ्या, पश्चिम रेल्वेवरील लोअर परेल आणि बोरीवली स्थानकातील पुलाच्या विस्ताराचेही उदघाटन होणार आहे.

ठाणे स्थानकाच्या कल्याण दिशेकडील पादचारी पूल शुक्रवारपासून खुला करण्यात येईल. कल्याण दिशेकडे फलाट क्रमांक २ आणि फलाट क्रमांक ९ या फलाटांना हा पादचारी पूल जोडणार आहे. या पादचारी पुलाला ३ उद्वाहक असून चार जिने असतील. स्थानकाच्या पूर्व दिशेकडील फूड प्लाझाच्या परिसरात बांधण्यात आलेल्या सरकत्या जिन्याचेही उद्घाटन केले जाणार आहे. विशेष म्हणजे ठाणे स्थानकात प्रथमच खालच्या दिशेने उतरणारे सरकते जिने सुरू होत आहेत.

नेरळ ते माथेरान ट्रेनच्या दोन फेऱ्या

माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय असलेल्या नेरळ-माथेरान ट्रेनलाही शुक्रवारी हिरवा कंदील देण्यात येणार आहे. मे २०१६ मध्ये मिनी ट्रेनचे दोन डबे रुळावरून घसरण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर सुरक्षा उपाययोजनांसाठी ट्रेन बंद ठेवण्यात आली होती. उद्घाटनानंतर ही गाडी सकाळी १०.३० वाजता नेरळ येथून सुटेल. मात्र, २७ जानेवारीपासून नेरळ ते माथेरानदरम्यान दोनच फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. नेरळ येथून सकाळी ६.४०  व माथेरान येथून दुपारी ३.३० वाजता ही गाडी सोडण्यात येईल.

एलईडीची रोषणाई

मध्य रेल्वेवरील ५२ स्थानके ‘एलईडी’ दिव्यांनी प्रकाशमान करण्यात आली असून याचे उद्घाटनही शुक्रवारी करण्यात येईल. ठाणे स्थानकापुढील दिवा, ठाकुर्ली, नेरळ, कर्जत या स्थानकांमध्ये एलईडी दिवे बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विक्रोळी स्थानकापर्यंत हे काम पूर्ण करण्यात आले आहे.

अन्य सुविधा

  • दादर, मानखुर्द, रे रोड आणि बोरीवली स्थानकात उद्वाहक
  • ग्रँट रोड, विरार कारशेड, लोअर परेल आणि माहीम स्थानकात सौरऊर्जा प्रकल्प
  • गोवंडी, टिटवाळा येथे आपत्कालीन कक्ष
  • किंग्ज सर्कल येथे तिकीट खिडकी
  • बदलापूर स्थानकात ‘वाय-फाय’ सुविधा.