मुंबईत सध्या एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. यामध्ये मुंबईत करोना काळात मदत म्हणून आर्मीकडून तब्बल १ हजार बेडचं कोविड रुग्णालय उभारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मुंबई विमानतळ टर्मिनल एकच्या बाजूलाच हे हॉस्पिटल उभारण्यात आल्याचं या मेसेजमध्ये सांगण्यात आलं आहे. त्यासंदर्भात आता लोकांकडून विचारणा होऊ लागली असताना मुंबई महानगर पालिकेकडून त्याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मुंबई महानगर पालिकेच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून यासंदर्भातलं एक ट्वीट रिट्विट करण्यात आलं आहे. त्यामध्ये व्हायरल होत असलेला मेसेज आणि त्याबाबतचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

काय आहे या मेसेजमध्ये?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये मुंबई विमानतळाजवळच्या एका हॉस्पिटलचा उल्लेख करण्यात आला आहे. “ज्या करोना रुग्णांना तातडीने उपचारांची गरज आहे, अशा रुग्णांसाठी लष्कराचं १ हजार बेडचं एक विशेष रुग्णालय सुरू करण्यात आलं आहे. हे रुग्णालय मुंबईच्या डोमेस्टिक विमानतळाच्या टर्मिनल १ पासून अत्यंत जवळ आहे. करोना रुग्णांचा मदतीचा हा देण्यासाठी या रुग्णालयामध्ये मोफत उपचार केले जातील. या रुग्णालयात अनेक स्पेशालिस्ट डॉक्टर देखील आहेत”, असं या मेसेजमध्ये सांगण्यात आलं आहे.