अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केल्याच्या घटनेला आता अडीच महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. आतापर्यंत या आत्महत्या प्रकरणानं अनेक वळण घेतली असून, सध्या सीबीआय तपास करत आहे. सीबीआयकडून चौकशी सुरू असतानाच मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी मोठा दावा केला आहे. सुशांत सिंह प्रकरणातील तथ्यांवरून स्पष्ट दिसतंय की ही आत्महत्याच होती, असं माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी केला आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी इंडिया टुडे वृत्तवाहिनीशी बोलताना ज्युलिओ रिबेरो यांनी हा दावा केला. मुंबई पोलीस या प्रकरणाचा योग्य दिशेनं व नीटपणे तपास करत होती. सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं तेव्हा त्याचं आपल्याला आश्चर्य वाटलं, असंही ते म्हणाले.

आणखी वाचा- सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआय अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा; हत्या झाल्याचे पुरावे नाहीत

“वस्तुस्थिती स्वीकारल्यास हा गुन्हा ज्या ठिकाणी घडला त्या व्यतिरिक्त इतर राज्यातही गुन्हा दाखल केला जाऊ शकतो किंवा इतर पोलीस ठाण्यामध्येही नोंदवला जाऊ शकतो. अशा वेळी समांतरपणे दोन ठिकाणी तपास केला जात असेल, तर ती मोठी समस्या बनते. सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं याचं मला आश्चर्य वाटलं. सर्वोच्च न्यायालयाचा तो अधिकार आहे आणि ते करू शकतात. पण मुंबई पोलीस या प्रकरणाचा योग्य पद्धतीनं तपास करत होते, असं मला वाटतं,” ज्युलिओ रिबेरो म्हणाले.

आणखी वाचा- भाजपाचं तोंड काळ होण्याची प्रक्रिया सुरू झालीये; सुशांत प्रकरणातील खुलाशावरून काँग्रेसची टीका

“या प्रकरणातील तथ्य काय आहेत? अभिनेता त्याच्या बेडरुममध्ये एका पंख्याला लटकलेला आढळला होता आणि बेडरुम आतून बंद होती. आता खोली आतून बंद होती हे कोणीही खोटं ठरवू शकेल का? चावी बनवणाऱ्या व्यक्तीनं साडेचार तास प्रयत्न केला, पण तो ते उघडू शकला नाही. मग त्यांनी कुलूप उघडण्यासाठी इतर पद्धतींचा वापर केला. त्यानंतर दरवाजा बाहेरून उघडला गेला. खोलीत बाहेरील कुणीही व्यक्ती नसताना तुम्ही आत्महत्येशिवाय इतर गोष्टींचा विचार कसा करू शकता?,” असा सवालही रिबेरो यांनी उपस्थित केला.

“मुंबई पोलीस दबावाखाली काम करत नव्हते, याबद्दल मला खात्री नाही. आजघडीला सर्व पोलीस दलांवर सत्ताधारी पक्षांचा आणि लोकांचा दबाव आहे,” असंही ते म्हणाले.