सुधारित नागरिकत्व कायद्यामुळं (सीएए) भटक्या-विमुक्तांना कसला त्रास होणार आहे? हे शरद पवारांनी सांगावं, अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागावी असे थेट आव्हान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांना दिले आहे. नवी मुंबईत आयोजित भाजपाच्या राज्य परिषदेत ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले, “या देशातील काही पक्ष असे आहेत ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. त्यामुळे सत्तेत येण्यासाठी हे काहीही करायला तयार आहेत. मध्यंतरी शरद पवार यांनी एक विधान केलं होतं की, सीएएचा भटक्या-विमुक्तांना त्रास होणार आहे. त्यामुळं मी विरोधकांना चॅलेंज करतो की, सीएएमुळं भटक्या-विमुक्तांना कुठला त्रास होणार हे त्यांनी दाखवून द्यावंच, जर तुम्हाला तर ते सिद्ध करता येणार नसेल तर तुम्ही मोदींची माफी मागावी”

“नागरिकता संशोधन विधेयकाच्या आवश्यकतेबाबत पंडीत जवाहरलाल नेहरु, कम्युनिस्ट पक्ष, लालबहादूर शास्त्री यांनीही मागणी केली होती. मात्र, आता त्या कायद्याविरोधात जाणीवपूर्वक वातावरण निर्माण केलं जात आहे. नेहरुंनी लियाकत यांच्यासोबत जो करार केला होता त्यात त्यांनी मान्य केलं होत की, पाकिस्तानातील हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन लोकांवर अत्याचार झाला तर भारत त्यांच्या पाठीशी उभा राहिलं. मग मोदींनी हा कायदा आणून काय चूक केली? हा नागरिकता घेणार नाही तर देणारा कायदा आहे. मात्र, याविरोधात सोशल मीडियातून खोटा प्रचार सुरु आहे.” असे फडणवीस यावेळी म्हणाले.

चंद्रकांत पाटील जिंकलेल्या टीमचे कॅप्टन
“पुन्हा एकदा स्वतःच्या जीवावार भाजपाचं सरकार आणणार राहिल्याशिवाय राहणार नाही. भाजपा ही हारलेली टीम नाही तर जिंकलेली टीम आहे. त्यामुळे या जिंकलेल्या टीमचे चंद्रकात पाटील हे कॅप्टन आहेत. भाजपात कुठलीही गोष्ट वारशात मिळत नाही. भाजपातील पद म्हणजे जबाबदारी आहे ते मिरवण्याची गोष्ट नाही. भाजपाला मोठ्या नेत्यांची परंपरा आहे,” असे फडणवीस यावेळी म्हणाले.

काश्मीरमध्ये वाहिले नाहीत रक्ताचे पाट झाली नवी पहाट
कलम ३७० हटवल्याबद्दल फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. हे कलम हटवल्यानंतर इथे रक्ताचे पाट वाहतील असं कोणीतरी म्हणालं होतं. मात्र, कलम ३७० रद्द झाल्यानंतर काश्मीरमध्ये शांतता आहे. इथे रक्ताचे पाट नाही नवी पहाट झाली आहे, असे फडणवीस यावेळी म्हणाले.