मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या वेशीवरील टोलनाक्यांवर अद्यापही जुन्या पद्धतीने वसुली

लोकसत्ता प्रतिनिधी

Agreli
जपानच्या चलनाचा कच्चा माल पुरवतो हिमालयाच्या कुशीतला ‘हा’ देश!
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Increase in prices of fruits and vegetables due to decrease in arrivals
खिशावर आर्थिक ताण; पालेभाज्या, फळभाज्यांच्या दरात वाढ
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम

ठाणे : केंद्र सरकारने टोलनाक्यांवर फास्टॅग यंत्रणेद्वारे टोलवसुली करण्याचे आदेश दिले असले तरी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या तिन्ही शहरांच्या वेशीवरील टोलनाक्यांवर अद्यापही अशाप्रकारे वसुली सुरू होऊ शकलेली नाही. या टोलनाक्यांवरील काही मार्गिकांवर फास्टॅग यंत्रणा असली तरी त्या मार्गिकांवर इतर वाहने शिरकाव करीत असून त्याचबरोबर काही वेळेस या यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे टोलवसुली होत नसल्याने टोल कर्मचारी आणि वाहनचालकांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. यामुळे टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागून कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीत वाहन अडकून पडू नये आणि नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान व्हावा या उद्देशातून केंद्र सरकारने टोलनाक्यांवर फास्टॅग बंधनकारक केले आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या तिन्ही शहरांच्या वेशीवरील टोलनाक्यांवरील काही मार्गिकांवर फास्टॅग यंत्रणा बसविण्यात आली आहे. तर उर्वरित मार्गिकांवर येत्या महिनाभरात ही यंत्रणा बसविण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत ज्या मार्गिकांवर फास्टॅग यंत्रणा आहे, त्या मार्गिकेवर केवळ फास्टॅग असलेल्या वाहनांनी प्रवास करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात तसे होताना दिसून येत नाही. या मार्गिकेवरून इतर वाहनेही प्रवास करतात. त्यामुळे फास्टॅग यंत्रणा असूनही अनेकांना टोलनाक्यावरील वाहनांच्या रांगेत थांबावे लागते. तसेच फास्टॅग मार्गिकांची अपुरी संख्या, फास्टॅगद्वारे टोल पैसे कपातीचे संदेश वेळेवर मिळत नाहीत, फास्टॅगच्या खात्यात पुरेसे पैसे जमा नसणे आणि फास्टॅग कार्ड वाहनाच्या दर्शनीय भागावर लावण्याऐवजी खिशात ठेवणे, यामुळेही टोलनाक्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्याचा फटका इतर वाहनचालकांना बसतो.

वाहनावर असलेले फास्टॅग अनेकदा ‘ब्लॅकलिस्ट’ दाखविले जाते. फास्टॅगच्या रांगेत आणखी वेळ वाया जात आहे. टोलनाक्यावरील फास्टॅगच्या रांगेतील वाहनाला अडविले जाते आणि त्यानंतर वाहनावरील फास्टॅगद्वारे आपोआप पैसे कापले जातात. परंतु यामध्ये बराच वेळ खर्ची पडतो. तोपर्यंत वाहनांच्या पाठीमागे रांगा लागून कोंडी होते, असे सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी सांगितले. तसेच टोलनाक्याच्या ठिकाणी गतीरोधक उभारले तर वाहनांचा वेग कमी होईल आणि त्यावेळेत फास्टॅगद्वारे टोलचे पैसे कापले जातील. त्यामुळे या वाहनाला तिथे जास्त वेळ थांबावे लागणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगतिले. तसेच फास्टॅगचे पैसे कापल्याचा संदेश उशिरा मिळतो. त्यामुळे टोलनाक्यावरील कर्मचारी आणि वाहनचालकांमध्ये वाद होतो. त्यामुळेही रांगा लागत असून यात सुधारणा होणे गरजेचे आहे, असे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी सांगितले.

वाहनाच्या फास्टॅग खात्यात पैसे होते. तरीही टोलनाक्यावरील फास्टॅग यंत्रणेद्वारे माझ्या फास्टॅगच्या खात्यातून पैसे कापले गेले नाही. त्यामुळे टोल कर्मचाऱ्यांनी रोखीने पैसे घेतले. काही अंतरावर गेल्यानंतर फास्टॅगमधून पैसे कापले गेल्याचा संदेश आला. त्यामुळे रोख आणि फास्टॅग अशा दोन्ही पद्धतीने टोलचे पैसे घेतले गेले असून या संदर्भात संबंधित विभागाकडे तक्रार केली आहे.

-दिनेश मार्य, डोंबिवली

वाहनांच्या दर्शनीय काचेवर फास्टॅग बसविण्यात येते. अनेक जण फास्टॅग बाद झाल्यानंतर त्याशेजारीच नवीन फास्टॅग बसवितात. त्यामुळे टोलनाक्यावरील फास्टॅग यंत्रणेद्वारे टोलचे पैसे कापून घेताना तांत्रिक अडचणी निर्माण होतात. तांत्रिक अडचणी हळूहळू दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. येत्या काळात टोलनाक्यावरील सर्वच मार्गिकांवर फास्टॅग यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे कोंडी कमी होईल.

– कमलाकर फंड, मुख्य महाव्यवस्थापक, एमएसआरडीसी टोल प्रशासन