२६/११ प्रमाणे हल्ला करू, अशी धमकी हॉटेल ताज पॅलेसला देणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात कुलाबा पोलिसांनी शनिवारी गुन्हा नोंदवला. या प्रकरणाचा तपास कुलाबा पोलिसांसह गुन्हे शाखा, राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) सुरू आहे.

एका व्यक्तीने २९ जूनच्या मध्यरात्री ताज पॅलेससह वांद्रे येथील ताज लॅण्ड्सएण्ड हॉटेलला दूरध्वनी केला. या व्यक्तीने आपण कराचीहून सुलतान बोलत असल्याचे सांगितले. लष्कर ए तोयबा या संघटनेचा अतिरेकी असून आम्ही हॉटेल ताजवर याआधी झालेल्या हल्ल्याच्या पुनरावृत्तीची तयारी करीत आहोत, अशी धमकी त्याने दिली. या अनोळखी व्यक्तीने ज्या क्रमांकावरून हॉटेलशी संपर्क साधला त्याआधारे तपास सुरू असल्याचे समजते.