नऊ कोटींचा प्रकल्प २५८ कोटींवर; पहिला टप्पा दीड वर्षांचा

मुंबई-ठाण्याचा दुवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि गेली काही वर्षे केवळ कागदावरच विकासाची उड्डाणे घेणाऱ्या कोपरी रेल्वे उड्डाणपुलाचा खर्च आता नऊ कोटींवरून तब्बल २५८ कोटींच्या घरात गेला असून त्यात तब्बल २८ पटींने वाढ झाली आहे. मात्र आता या प्रकल्पातील सर्व अडथळे दूर झाले असून पोहोच रस्त्यांच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत या पुलाचे काम सुरू होईल असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला आहे. या आठ पदरी उड्डाणपुलाचा पहिला टप्पा पूर्ण होण्यास दीड वर्षे लागणार असल्याने टोलनाका परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कायम राहणार आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरील कोपरी रेल्वे उड्डाणपुलावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. महामार्ग दोन्ही बाजूंस चार पदरी असला तरी पुलावर  दुपदरी असल्याने या भागात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत चालली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात या पुलाच्या रुंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पुलाच्या दोन्ही बाजूंस मार्गिका बांधण्याचा नऊ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव सरकारने मंजूरही केला. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने सन २००१ मध्ये प्रकल्पाचा आराखडा मान्यतेसाठी रेल्वेस सादर केला. मात्र रेल्वेची आडमुठी भूमिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची अनास्था यामुळे दीड वर्षांत अपेक्षित असलेल्या आणि लाखो प्रवाशांना दिलासा देणाऱ्या या उड्डाणपुलाचा १४ वर्षांचा वनवास संपला आणि २०१४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावास रेल्वेने मान्यता दिली त्या वेळी त्याचा खर्च ९० कोटींच्या घरात पोहोचला होता. भाजप-शिवसेनेने सन २०१५ मध्ये या उड्डाणपुलांची जबाबदारी एमएमआरडीएवर टाकली. त्यानुसार प्राधिकरणाने २५८ कोटींचा विस्तृत आराखडा तयार करून तो पुन्हा रेल्वेला सादर केला. त्याला मार्च २०१६मध्ये रेल्वेने मान्यता देताना उड्डाणपूलाची उंची वाढविण्याची अट घातली. खर्चाचा काही भाग रेल्वेने उचलावा अशी मागणी प्राधिकरणाने केली. हा भार उचलण्यास रेल्वने नकार दिला. सह प्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी उड्डाणपुलांसाठी निविदाही काढण्यात आल्याचे सांगितले.

असा असेल नवा पूल

सध्याचा उड्डाणपूल दुपदरी आहे. त्याच्या दोन्ही बाजूंस दोन दोन मार्गिकांचे पूल बांधण्यात येणार आहेत. हे पूर्ण झाल्यावर त्यावर वाहतूक वळविली जाईल. त्यानंतर सध्याचा उड्डाणपूल पाडून तेथे चार मार्गिकांचा नवा पूल बांधण्यात येणार असून हे पूल रेल्वे स्टील स्ट्रक्चरने बांधणार आहे. त्यामुळे तेथे आठ पदरी उड्डाणपूल होईल.