संदीप आचार्य

अंधेरी मरोळ येथील कामगार रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील २३ जिल्हा रुग्णालयांसह सर्व प्रमुख रुग्णालयांमधील अग्निसुरक्षेचे परीक्षण तात्काळ करून घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आग लागल्यास रुग्णांना सुरक्षितपणे रुग्णालयाबाहेर हलविण्यासाठी डॉक्टर कर्मचारी व सुरक्षा रक्षकांनाही विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

काही वर्षांपूर्वी कोलकत्ता येथील रुग्णालयाला लागलेल्या आगीपासून ते दोन दिवसांपूर्वी अंधेरी मरोळ येथील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीसारख्या अनेक घटनांमध्ये अनेक रुग्णांचे बळी गेले आहेत.

मुंबईतील रुग्णालयांचे महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे तपासणी करण्यात येत असली तरी अंधेरी येथील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीनंतर या तपासणीबाबतही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मुंबई, ठाणे, पुणे आदी काही शहरांमध्ये अग्निशमन विभाग सक्षम असला तरी राज्यातील अन्य महापालिका व नगरपालिकांमधील अग्निशमन व्यवस्था यथातथाच असून या साऱ्याचा विचार करून २३ जिल्हा रुग्णालये, सात सामान्य रुग्णालये आणि १३ स्त्री रुग्णालयांमधील आरोग्य यंत्रणेची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या या रुग्णालयांमध्ये मोठय़ा प्रमाणात दररोज रुग्ण उपचारासाठी येत असून रुग्णालयाच्या अग्निसुरक्षेचा आढावा घेऊन योग्य त्या सुधारणा तातडीने केल्या जातील असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. तथापि आरोग्य विभागाची बहुतेक रुग्णालये ही मुंबईतील रुग्णालयांप्रमाणे बहुमजली नाहीत. तसेच तेथे लाकडी फर्निचर अथवा काचेची तावदानेही नसल्यामुळे आगीचा धोका कमी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र रुग्ण व रुग्णालय सुरक्षा याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल व तपासणीनंतर आवश्यक असलेल्या अग्निप्रतिबंधक उपकरणांची व यंत्रणेची व्यवस्था करण्यासाठी आर्थिक तरतूद केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये धोक्याची घंटा बसविण्यात येणार असून आग अथवा अन्य कोणती आपत्ती आल्यास तात्काळ रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाईल. त्याचप्रमाणे याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी नियमितपणे मॉक ड्रीलही केले जाईल.

-डॉ. प्रदीप व्यास, प्रधान सचिव आरोग्य