पहिल्या प्रवेश यादीतील गुणमर्यादेत गतवर्षीपेक्षा दोन टक्क्यांची वाढ

मुंबई : दहावीच्या परीक्षेतील गुणांच्या उधळणीचा आनंद आता अकरावी प्रवेशाच्या रांगेत मात्र ओसरू लागला असून पहिल्याच फेरीसाठीची प्रवेश गुणमर्यादा (कट ऑफ) यंदा दोन ते तीन टक्क्यांनी वाढल्याचे दिसत आहे. वाणिज्य, विज्ञान शाखेबरोबरच कला शाखेतील प्रवेशातही ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळाले आहे. त्यामुळे आता आपल्या मनाजोगते महाविद्यालय मिळणार का, या शंकेने नव्वद टक्क्य़ांपेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.

अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची पहिली प्रवेश यादी गुरूवारी प्रवेश समितीकडून जाहीर करण्यात आली. पहिल्याच प्रवेश फेरीच्या कट ऑफ गुणांत साधारण दोन ते अडीच टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नामवंत महाविद्यालयांसाठीची स्पर्धा यंदा अधिकच वाढल्याचे दिसत आहे. कला, वाणिज्य, विज्ञान या तिनही शाखांचे काही महाविद्यालयांचे कट ऑफ गुण हे ९० टक्क्यांपेक्षाही अधिक गेले आहेत.

वाणिज्य शाखेसाठी उपलब्ध जागांच्या तुलनेत इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या ४२ हजारांनी अधिक आहे. त्यामुळे वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठी मोठी चुरस रंगली आहे. आता पुढील फेरीत वाणिज्य शाखेच्या रिक्त जागांची संख्या तुलनेने कमी असणार आहे. विज्ञान शाखेसाठी आलेल्या अर्जाची संख्या उपलब्ध जागांच्या तुलनेत सुमारे अडीच हजारांनी जास्त आहे. कला शाखेसाठी प्रवेश घेणाऱ्यांमध्ये नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. कला शाखेचे कट ऑफ गुण हे ८६ ते ८० टक्क्यांदरम्यान आहेत. काही महाविद्यालयांमध्ये कला शाखेचे कट ऑफ गुण हे विज्ञान शाखेपेक्षाही अधिक आहेत. किमान कौशल्याधारित अभ्यासक्रमासाठी (एचएसव्हीसी / एमसीव्हीसी) विद्यार्थ्यांकडून मिळणारा प्रतिसाद मात्र घटता असल्याचे दिसत आहे.

१ लाख ५२० विद्यार्थ्यांना प्रवेश

अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या २,०३,१२० विद्यार्थ्यांपैकी १,००,५२० विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळाला आहे. त्यामधील ३५,७८७ विद्यार्थ्यांना पसंतीक्रमानुसार  महाविद्यालय मिळाले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना या फेरीतच मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. या फेरीत प्रवेश न मिळालेले किंवा दुसऱ्या किंवा खालील क्रमांकाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत संधी मिळणार आहे.

पुढील प्रवेश प्रक्रिया

*  पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागेल, अन्यथा हे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडतील

*  ६ ते ९ जुलैपर्यंत (रविवार वगळून) सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करायचा आहे.

* १० जुलैला पुढील फेरीसाठीचा रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येईल

* १० आणि ११ जुलैला पुढील फेरीसाठी महाविद्यालयाचे पसंतीक्रम बदलता येतील.

* विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम न बदलल्यास पहिल्या फेरीचे पसंतीक्रम गृहित धरून प्रवेश यादी जाहीर करण्यात येणार आहे.

* १३ जुलैला दुसरी प्रवेश यादी जाहीर करण्यात येणार आहे.

द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाच्या जागा रिक्तच

नियमित फेरीपूर्वी द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या दोन फेऱ्या घेण्यात आल्या. या अभ्यासक्रमासाठी साधारण २६ हजार जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी २४ हजार ८४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी दोन फेऱ्यांमध्ये १२ हजार ४८२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले. मात्र प्रत्यक्षात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी २ हजार ४४७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतले आहेत.

प्रवेशाची सद्यस्थिती (केंद्रीय प्रवेश प्रक्रिया)

शाखा        उपलब्ध जागा   आलेले अर्ज     मिळालेले प्रवेश

कला             २०,३२०      १७,५८१                १२,६११

वाणिज्य       ८७,२८५      १,२९,५०६             ७२,०५४

विज्ञान        ५२,४३६        ५४,७१५                ३४,८४०

एमसीव्हीसी     ३,८९९        १,३१८               १,०६३

एकूण         १,६३,९४३       २,०३,१२०          १,२०,५६८

कट ऑफ गुण (महाविद्यालयाचे नाव व कंसात टक्के)

वाणिज्य शाखा

केसी, चर्चगेट(९०.२०), जयहिंद, चर्चगेट (९०.६६), एचआर, चर्चगेट (९२), नरसी मोनजी, चर्चगेट (९४.२), मिठीबाई, विलेपार्ले (९०.३३), पोद्दार, माटुंगा (९३),  रुपारेल, माटुंगा (९१.८), वझे-केळकर, मुलुंड (९०.८), मुलुंड कनिष्ठ महाविद्यालय (९१.४), सी.एच.एम, उल्हासनगर (८४.२), पाटकर, गोरेगाव (८५), हिंदुजा, चर्नी रोड (८९.२)

कला शाखा

केसी, चर्चगेट(८६), जयहिंद, चर्चगेट (८९.८), मिठीबाई, विलेपार्ले (८७.२), रूईया, माटुंगा (९२.२), रुपारेल, माटुंगा (८६), वझे-केळकर, मुलुंड (८६.८), सेंट झेविअर्स, फोर्ट (९४.२), हिंदुजा, चर्नी रोड (७४.२)

विज्ञान शाखा

केसी, चर्चगेट(८७), जयहिंद, चर्चगेट (८५.८३), मिठीबाई, विलेपार्ले (८८.४), रूईया, माटुंगा (९३.२), रुपारेल, माटुंगा (८९.६), वझे-केळकर, मुलुंड (९३), सेंट झेविअर्स, फोर्ट (९०.४), सी.एच.एम, उल्हासनगर (९०), बी.एन. बांदोडकर, ठाणे (९१.८), हिंदुजा, चर्नी रोड (८७)