बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप

जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेल्या पाच रुग्णांची दृष्टी गेल्याचा आरोप नगरसेवक अभिजित सामंत यांनी पालिकेच्या स्थायी समितीत केला असून याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पालिकेच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात ४ जानेवारी रोजी ७ जणांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली. दुसऱ्या दिवशी डोळ्याची पट्टी काढल्यानंतर यातील सहा रुग्णांचे डोळे लालसर दिसले, डोळ्यांत जंतुसंसर्ग आढळला. त्यानंतर या सहा रुग्णांना ६ जानेवारीला केईएम रुग्णालयात पाठविले. सातव्या रुग्णांमध्येही संसर्ग झाल्याने त्याला १० जानेवारीला केईएममध्ये पाठविले. सीता सिंग, बाळुदेवी खाडका, फातिमा शेख, रत्नामा संन्याशी, रफिक खान, गौतम गवाने, संगीता राजभर यांच्यावर केईएममध्ये उपचार केले गेले.

यात सात जणांपैकी पाच जणांची दृष्टी गेल्याची माहिती देत नगरसेवक अभिजीत सामंत यांनी स्थायी समितीमध्ये रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप केला. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. ट्रॉमा केअर रुग्णालयात विविध कर्मचारी वार्डबॉयचे काम करतात. शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या साधनांची स्वच्छता प्रशिक्षण नसलेले कर्मचारी करतात. शस्त्रक्रियागृह प्रत्येक दिवशी स्वच्छ करणे आवश्यक असूनही या रुग्णालयात ते दोन आठवडय़ांतून एकदा साफ केले जाते. या कारणांमुळे रुग्णांना संसर्ग झाल्याचेही पुढे सामंत यांनी सांगितले.

सात जणांपैकी चार जणांची दृष्टी सुधारलेली आहे. तीन जणांची दृष्टी सुधारत असून महिन्याभरानंतर त्यांच्याबाबत अंतिम निर्णय सांगता येईल. यातील सहा जणांना घरी सोडले असून एका रुग्णावर केईएममध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णालय पाच वर्षांपासून सुरू असून अशी घटना प्रथमच होत आहे. डॉ. अरुण चौधरी नेत्रचिकित्सक महिन्याला रुग्णालयात मोतीबिंदूच्या ३५० ते ४०० शस्त्रक्रिया करतात. त्यामुळे स्वच्छतेमुळे ही घटना घडल्याचा आरोप चुकीचा आहे, असे बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरबंस सिंग बावा यांनी सांगितले.

केईएम रुग्णालयात आलेल्या रुग्णांवर पुन्हा शस्त्रक्रिया करून संसर्ग काढला आहे. यातील एका रुग्णाची दृष्टी गेली. अन्य रुग्णांमधील जंतुसंसर्ग बरा झाल्याने दृष्टिदोष नाही. शस्त्रक्रिया करताना घ्यावयाच्या काळजीबाबत अहवाल ट्रॉमा रुग्णालयाला पाठवला आहे.    – डॉ. हेमंत देशमुख, अधिष्ठाता, केईएम

चौघांची दृष्टी सुधारली असून तिघांची दृष्टी सुधारते आहे. महिन्यानंतर त्यांच्याबाबत नेमके निरीक्षण नोंदवता येईल.डॉ. अरुण चौधरी महिन्याला मोतीबिंदूच्या ३५० ते ४०० शस्त्रक्रिया करतात. त्यामुळे अस्वच्छतेमुळे हा प्रकार घडला, या आरोपात तथ्य नाही.    – डॉ. हरबंस सिंग बावा, वैद्यकीय अधीक्षक, बाळासाहेब ठाकरे रुग्णालय