महिनाभरापासून अतिशय संथगतीने कामे; जानेवारीअखेरीस पर्यटकांना खुले करण्याचा प्रयत्न

नूतनीकरण आणि संवर्धनाच्या कामासाठी गेल्या वर्षभरापासून बंद असलेल्या दक्षिण मुंबईतील ‘फ्लोरा फाऊंटन’च्या कामाला वस्तू आणि सेवा करामुळे (जीएसटी) खीळ बसली आहे. जीएसटी लागू झाल्यापासून वाढलेला आर्थिक खर्च आणि निधीची चणचण यांमुळे गेल्या महिनाभरापासून या ऐतिहासिक कारंज्याच्या संवर्धनाचे काम रखडले आहे. यातून तोडगा काढण्यासाठी महापालिका आणि संवर्धन करणाऱ्या कंत्राटदारामध्ये चर्चा सुरू असून जानेवारी अखेरीपर्यंत फ्लोरा फाऊंटन नागरिकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे.

सुमारे दीडशे वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या फ्लोरा फाऊंटनची अतिशय दुरवस्था झाल्यामुळे गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून काळय़ा पडद्यांनी झाकून या शिल्पाच्या संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले. मार्च २०१७ अखेरीस तज्ज्ञ संवर्धकांनी त्यावर शास्त्रीय पद्धतीने काम करण्यास सुरुवात केली. मात्र जीएसटी लागू झाल्यामुळे खर्चाचे आकडे बदलल्याने वाढीव निधीचा गुंता अजूनही सुटत नसल्याचे दिसत आहे. यामुळे दिवाळीपासूनच काम कमी प्रमाणात सुरू असल्याची माहिती संवर्धक विकास दिलावरी यांनी दिली. या संदर्भात पालिकेच्या पुरातन वास्तू जतन विभागातील अधिकाऱ्यांशी बैठक झाली असून येत्या काही दिवसांत काम सुरू करून तीन महिन्यांत संवर्धित कारंजे पालिकेच्या हातात सोपविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. काही आर्थिक अडचणींमुळे कारंजाचे काम मध्यंतरीच्या काळात थांबविण्यात आले होते. मात्र कंत्राटदारांशी चर्चा झाली असून निधीची उपलब्धता करून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचे पालिकेचे वरिष्ठ पुरातन वास्तू जतन अभियंता संजय सावंत यांनी सांगितले. तसेच येत्या दोन अडीच महिन्यांत काम पूर्ण करून मुंबईकरांसाठी कारंजे खुले करणार असल्याचे कनिष्ठ पुरातन वास्तू जतन अभियंता सुदर्शन शिरसाट यांनी सांगितले.

कारंजाच्या शिखरावर असलेल्या ‘फ्लोरा’ या रोमन देवतेच्या पूर्णाकृती मूर्तीचे काम पूर्ण झाले असून खाऱ्या वाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी कारंजावरील भाग झाकून ठेवण्यात आला आहे. कारंज्यामधून पाडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाकरिता ब्रिटिशकालीन यंत्रणेत पूर्णपणे तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत कारंजाला पडलेल्या चिरा भरण्याचे काम शिल्लक असून भंग पावलेल्या शिल्पांच्या संवर्धनाचे काम येत्या काही दिवसांत सुरू होईल. वास्तू सातत्याने पाण्यात राहिल्याने त्यावर शेवाळ तयार होऊ नये याकरिता रासायनिक द्रव्याचे लेपन केले जाणार आहे.

फ्लोरा फाऊंटनविषयी

’१८६९ मध्ये हे देखणे शिल्प उभारण्यासाठी कस्रेटजी फर्दूमजी पारेख या दानशूर पारसी माणसाने सढळ हस्ते देणगी दिल्यावर ‘अ‍ॅग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया’ या संस्थेने फ्लोरा फाऊंटन शिल्पाचे काम पूर्णत्वास नेले.

’आधुनिक मुंबईचे आद्य शिल्पकार गव्हर्नर सर बार्टले फ्रियर यांच्या स्मरणार्थ हे कारंजे बांधले गेले आहे. या बांधकामासाठी ६७ हजार रुपये इतका खर्च झाल्याची नोंद आहे.

’ सुरुवातीच्या काळात या कारंजाला ‘फ्रि यर फाऊंटन’ असे संबोधले जात होते. कालांतराने त्याला ‘फ्लोरा फाऊंटन’ हे नाव रूढ झाले.