वादग्रस्त वक्तव्यांमुळे बऱ्याचदा चर्चेत असणारे भाजपाचे आमदार राम कदम हे सध्या एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आले आहेत, ती म्हणजे ‘ओडोमॉस’. दोन महिन्यांपूर्वी दहिहंडीच्या दिवशी मंचावरुन जाहीररित्या मुलींबाबत केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. यामुळे आपली मलीन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी त्यांनी चक्क दिवाळीनिमित्त ‘ओडोमॉस’ वितरणाचा कार्यक्रम हाती घेतला होता. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी त्यांनी आपला एक व्हिडीओ ७ नोव्हेंबर रोजी फेसबूक आणि ट्विटरवरुन शेअर केला होता. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. हा व्हिडीओपाहून अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे.

अडीच मिनिटांचा हा व्हिडिओ असून यामध्ये राम कदमांनी सोवळ्याप्रमाणे एक वस्त्र अंगावर परिधान केले आहे. तसेच ते स्वच्छ हिंदीतून आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते बसलेल्या खुर्चीच्या समोरुन या व्हिडीओचे चित्रीकरण करण्यात आले आहे. मात्र, त्यांचे आसन आणि कॅमेरा यामध्ये असणाऱ्या मोठ्या टेबलावर टेबल भरुन अनेक ओडोमॉसचे पॅक ठेवण्यात आले आहेत. अर्थातच ओडोमॉचा संबंध हा मच्छरांशी येतो हे आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. नेमकं याच कारणासाठी कदमांनी या ओडोमॉसच्या पॅक्ससोबत व्हिडिओ तयार केला आहे.

या व्हिडिओतून राम कदम सांगतात की, मुंबई शहरांमधील विविध सोसायट्यांमध्ये वॉचमन, लिफ्टमन काम करतात. त्यांना रात्रपाळीच्यावेळी नेहमीच मच्छर चावण्याचा त्रास सहन करावा लागतो. या त्रासातून त्यांची सुटका करण्यासाठी त्यांना मोफत हे ओडोमॉसच्या पॅकचे वितरण करण्यात येणार आहे. बऱ्याचदा वॉचमनचे काम करणारे लोक हे वयस्कर आणि आपल्या वडिलधाऱ्यांप्रमाणे ज्येष्ठ नागरिक असतात. त्यामुळे त्यांची या त्रासातून मुक्तता करण्यासाठी ओडोमॉस वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे.

मात्र, हा व्हिडिओ बघितल्यानंतर अनेकांनी राम कदम यांच्या या उपक्रमाचे कौतुक करण्याऐवजी त्यांना ट्रोल केले आहे. कदमांना आता मराठी मतांची खात्री राहिलेली नाही त्यामुळे ते परप्रांतियांच्या मतांच्या लालसेपोटी हे काम करीत आहेत. तसेच ओडोमॉसची ते जाहीरात करीत असल्याचे म्हणत एकाने भाजपाला चक्क भारतीय जाहीरात पार्टी म्हणून संबोधले आहे. तर एकाने म्हटले की, कदमांनी वादग्रस्त व्यक्तव्य करण्यापूर्वी आपण काय बोलतोय याचा विचार केला असता तर त्यांच्यावर ओडोमॉस वाटपाची वेळ आली नसती. तर एकाने त्यांना एका जुन्या किस्याची आठवण करुन देत सांगितले की, तुम्ही तेच राम कदम आहात का? ज्यांनी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना हिंदीतून शपथ घेण्यास विरोध केला होता. त्यामुळे तुमची हुजरेगिरी महाराष्ट्र व मराठी भाषा कधीच विसरणार नाही.

राम कदम आमल्या मतदारसंघात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात. या कार्यक्रमांची माहिती ते आपल्या फेसबूक पेज आणि ट्विटरवरुन देत असतात. यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारे केलेल्या कार्यक्रमांची माहिती देणारे व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केले आहेत. अधिकाधिका लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा चांगला प्लॅटफॉर्म असल्याने ते याचा वापर करीत आहेत.