मुंबई : करोना लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना उपनगरी रेल्वे गाड्यांमधून प्रवास करण्याची परवानगी मिळावी, यासाठी काही नेत्यांनी घोषणा करूनही मुहूर्त न मिळालेले आंदोलन अखेर शुक्रवारी करण्यात येणार आहे. मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरांमधील महत्त्वाच्या स्थानकांवरून भाजप कार्यकर्ते लोकल प्रवास करतील, असे मुंबई भाजप प्रभारी अतुल भातखळकर यांनी सांगितले.

किमान लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी मिळावी, अशी भूमिका नेत्यांनी जाहीर केली होती, आंदोलन करण्याचा इशारा काही नेत्यांनी दिला होता. प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी तर २ ऑगस्टला आंदोलनाची घोषणा केली होती. मात्र मुंबई भाजप अध्यक्ष लोढा व अन्य नेत्यांमधील समन्वयाअभावी आंदोलन होऊ शकले नव्हते. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते  सचिन सावंत यांनी भाजपला चिमटा काढला होता.

यासंदर्भात भातखळकर म्हणाले, आम्ही सुरुवातीला प्रवाशांतर्फे स्वाक्षरी आंदोलन केले, बोरिवलीला रेल्वे स्थानकाबाहेर निदर्शने केली. आता पुढील टप्प्यात  दोन मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र घेऊन लोकल प्रवास आंदोलन महत्त्वाच्या स्थानकांवरून केले जाईल.

भाजपतर्फे राज्यात स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान

भाजपतर्फे देशभर राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान सुरू करण्यात आले असून राज्यात गुरुवारी या अभियानाचा प्रारंभ होत आहे. या माध्यमातून पक्षाचे कार्यकर्ते ४४ हजारपेक्षा अधिक खेड्यांपर्यंत जाऊन करोना रोखण्याच्या आणि आरोग्य, स्वच्छता जागृतीच्या कामात आपले योगदान देतील, असे अभियानाचे संयोजक व भाजप वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. अजित गोपछडे यांनी बुधवारी सांगितले.  या अभियानाचा प्रारंभ दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात होणार असून त्यास प्रदेश प्रभारी सी. टी. रवी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.