मुंबईमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. कालापासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईमधील तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक कोलमडली आहे. मध्य, पश्चिम तसेच हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुकीला पावसाचा फटका बसला आहे. पहाटेपासूनच तिन्ही मार्गावरील लोकल गाड्या उशीराने धावत आहेत. सायन तसेच इतर काही ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या मार्गावरील ठाणे ते सीएसटीदरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पश्चिम तसेच हार्बर मार्गावरील वाहतूकही २० ते २५ मिनिटे उशीराने सुरु आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र सरकारने मुंबईमधील कार्यलये, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. मात्र ही सुट्टी जाहीर करुन त्यासंदर्भातील माहिती चाकरमान्यांना मिळेपर्यंत लोकल ट्रेनसंदर्भातील अपडेट्ससाठी प्रवाशांनी अगदी सोशल नेटवर्किंगपासून ते एम इंडिकेटर सगळीकडे चर्चा केली. लोकल ट्रेनच्या अपडेट्ससाठी लोकप्रिय असणाऱ्या एम इंडिकेटर अप्लिकेशनवरील लाइव्ह चॅटच्या माध्यमातून अनेकजण एकमेकांना रेल्वेसंदर्भातील माहिती देत होते. मात्र यामध्येही अनेकांनी मजेशीर मेसेजेस टाकत पावसामुळे आलेलं टेन्शन हलकं केलं.
‘सायन स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर टिसी आहे, भावांनो संभाळून जा’, ‘मी जस्ट कल्याण स्थानकावरुन घरी आलोय. कुठेही जाऊ नका घरी जाऊन झोपा, गुड नाईट’, ‘शाळा, कॉलेजेस आणि सरकारी कार्यलयांना सुट्टी तर प्रायव्हेटवाले काय विमानाने येणार का?’, ‘नालासोपारा स्टेशनचे फोटो पाठवा माझ्या बॉसला विश्वास बसत नाहीय’, ‘ज्यांच्याकडे स्वत:ची बोट आहे त्यांनी ऑफिसला जा बाकीच्यांनी घरी जा’ हे आणि असे अनेक भन्नाट मेसेजेस एम इंडिटेकटरच्या लाइव्ह चॅटवर पहायला मिळत आहेत. अनेकांनी या असल्या मजेशीर मेसेजला ‘ही खूप महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद’ किंवा ‘याला पकडलं वाटतं टिसीने म्हणूनच असा मेसेज टाकलाय’ अशी उपरोधक उत्तरे दिली आहेत. या मजेशीर मेसेजेसचे स्क्रीनशॉर्टस आता व्हायरल होत आहेत.
अशाप्रकारे एम इंडिकेटवर गंभीर चर्चेमध्येच मजेदार चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे ट्विटवरही पावसासंदर्भातील अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत. मागील वर्षीही इडलीवाल्यासंदर्भात चौकशी करणारा एम इंडिकेटरवरील चॅटचा स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 2, 2019 10:29 am