23 September 2020

News Flash

विसर्जनाच्यावेळी आवाज नियमांचे उल्लंघन

ध्वनिप्रदूषण करणाऱ्यावर कारवाईचे अधिकार असलेल्या पोलिसांच्या उपस्थितीतच मिरवणुकांचे आवाज वाढलेले होते.

सातव्या दिवशीही मर्यादेच्या दुपटीहून अधिक पातळी

ध्वनिप्रदूषणाचे आणि शांतता क्षेत्रांचे नियम लागू असतानाही गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी आवाजाच्या मर्यादांचे सरसकट उल्लंघन झालेले दिसले. ध्वनिप्रदूषण करणाऱ्यावर कारवाईचे अधिकार असलेल्या पोलिसांच्या उपस्थितीतच मिरवणुकांचे आवाज वाढलेले होते. संध्याकाळी बहुतेक सर्व विसर्जनस्थळी आवाजाच्या मर्यादेच्या दुपटीहून अधिक पातळी गाठली गेली होती. रात्री दहानंतरही यात बदल झाला नाही. काही ठिकाणी आवाजाची पातळी मोजली जात असल्याचे लक्षात आल्यावर वाद्य बंद करण्याचेही प्रकार घडले.

ध्वनिप्रदूषणासंबंधीच्या नियमांनुसार निवासी परिसरात ५५ डेसिबल तर शाळा, रुग्णालय, न्यायालय व मंदिर यांच्या आजुबाजूच्या परिसरातील शांतताक्षेत्रात ५० डेसिबल आवाजाची मर्यादा पाळणे गरजेचे असते. त्यातही रात्री दहानंतर निवासी परिसरात ५० डेसिबल तर शांतता क्षेत्रात ४५ डेसिबलची मर्यादा आहे. दीड दिवसाच्या गणेश विसर्जना वेळी ही मर्यादा ओलांडली गेली होती. मंगळवारी जोरदार पाऊस पडल्याने पाचव्या दिवशी बहुतेक गणपतींचे विसर्जन होऊ शकले नाही. त्यामुळे गुरुवारी सातव्या दिवशी शहरभरातून गणेश विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या. यावेळी मिरवणुकांमधील आवाज आधीच्या वर्षांपेक्षा कमी असले तरी काही ठिकाणी मात्र आवाजाची मर्यादा अजिबात पाळली गेली नाही. आवाज फाउंडेशनकडून रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान सांताक्रूझ पोलीस स्टेशन, लिंकिंग रोड, जुहू कोळीवाडा, माहीम, सेनाभवन, शिवाजी पार्क, प्रभादेवी, नाना चौक, ताडदेव, केम्प्स कॉर्नर, सेंच्युरी बाझार, बॉम्बे स्कॉटिश स्कूल इ. ठिकाणी आवाजाची पातळी मोजली गेली. यावेळी सर्वच ठिकाणी आवाज १०० डेसिबलपुढे गेला होता. ड्रम, ध्वनिक्षेपक यांच्यासोबतच झांजा, धातूची इतर वाद्य वाजवली जात होती. महत्त्वाचे म्हणजे रात्री दहा वाजल्यानंतरही अनेक मिरवणुकांमध्ये वाद्यांचा व ध्वनिक्षेपकांचा आवाज जराही कमी झाला नव्हता.

पोलिसांची उपस्थिती नावालाच

वरळी उड्डाणपुलाजवळ सर्वाधिक १११.५ डेसिबलपर्यंत आवाजाची पातळी नोंदवण्यात आली. धातूच्या वाद्यांचा सर्वाधिक वाजात येत होता. सेनाभवन जवळून जाणाऱ्या मिरवणुकांचा आवाज मोजण्यासाठी डेसिबल मीटर काढल्यावर वाद्यांचे आवाज थांबल्याचाही अनुभव आला, असे आवाज फाउंडेशनच्या सुमायरा अब्दुलाली यांनी सांगितले. यातील बहुतांश मिरवणूक ठिकाणी पोलिसांची उपस्थिती होती. तरीही आवाजाची पातळी कमी झाली नव्हती, असेही त्या म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2017 4:18 am

Web Title: ganesh visarjan 2017 violation of sound rules
Next Stories
1 महाविद्यालयांत वाहन परवान्याची योजना कागदावरच
2 शृंखला कदम आणि सुनील जमाल ‘ब्लॉग बेंचर्स’चे विजेते
3 अकरावीचे प्रवेश रद्द करण्यासाठी नियमावली
Just Now!
X