लोकमान्यांनी जनजागृतीसाठी सुरू केलेल्या गणेशोत्सवाला ब्रिटिशांनी विरोध केला नाही, मात्र आज आपलीच मंडळी त्यास विरोध करीत आहेत. हा हिंदूंचा सण असून तो भारतात साजरा करायचा नाही तर मग काय पाकिस्तानमध्ये साजरा करायचा का, असा खोचक सवाल करीत न्यायालयाचे आदेश काहीही असले तरी गणेशोत्सव हा नेहमीच्या उत्साहातच साजरा होईल. त्यासाठी शिवसेना मंडळाच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिली.
रंगशारदा सभागृहात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा मार्गदर्शन मेळावा ठाकरे यांच्या उपस्थित पार पडला. त्या वेळी त्यांनी कोणी काहीही म्हणत असले तरी हा उत्सव दणक्यातच साजरा करण्याचे स्पष्ट केले. रस्त्यावर बसून नमाज पढणाऱ्यांच्या विरोधात कोणीही कोर्टात कधी गेले नाही, पण आपल्या उत्सवांविरोधात आपलीच लोकं कोर्टात जातात अशी खंत व्यक्त केली. याचवेळी विसर्जनादरम्यान होणाऱ्या घाणेरडय़ा प्रथा बंद झाल्या पाहिजेत, असेही त्यांनी मंडळांना सांगितले.
नालेसफाईवरून टीका करणाऱ्या भाजपचाही उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला. मुंबईत एका दिवसात ३०० मिलिमीटर पाऊस पडला तर मुंबई तुंबणार नाही का, असा सवाल करतानाच दिल्लीत १०० मिमी पाऊस पडला तरी नाले तुंबले. तिथे सत्ता कोणाची आहे, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.