25 September 2020

News Flash

प्रसिद्धीच्या शिबिरांमुळे रक्तदान व्यर्थ!

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा उत्सव काळात मोठय़ा प्रमाणावर ही शिबिरे आयोजित केली जातात.

उत्तर प्रदेश व कर्नाटकानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक रक्त वाया जाते.

व्यवस्थापन यंत्रणेचा अभाव असल्याने हजारो युनिट रक्ताचा अपव्यय

मोठय़ा स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या रक्तदान शिबिरांमध्ये जमा होणारे बहुतांश रक्त वायाच जात असल्याचे स्पष्ट होऊनही मुंबईत काही संस्था व सार्वजनिक मंडळे अशा प्रकारच्या महारक्तदान शिबिरांच्या आयोजनात पुढाकार घेत आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा उत्सव काळात मोठय़ा प्रमाणावर ही शिबिरे आयोजित केली जातात. त्यांचा हेतू प्रामाणिक असला तरी अशा ठिकाणी गरज नसताना हजारो युनिट रक्त जमा होते. तसेच, या रक्ताचे वेळीच व्यवस्थापन करणाऱ्या सक्षम यंत्रणेचा अभाव असल्याने बरेचसे रक्त वाया जाते. म्हणूनच या संस्थांना चाप लावण्याची गरज वैद्यकीय क्षेत्रात व्यक्त होत आहे.

उत्तर प्रदेश व कर्नाटकानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक रक्त वाया जाते. राष्ट्रीय सण, उत्सवांच्या काळात राजकीय पक्ष व संस्थांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरांमध्ये मोठय़ा प्रमाणात रक्त गोळा होते. ते वाया जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा दिवसांत मोठय़ा संख्येने रक्तदान शिबिरे आयोजित करण्याऐवजी वर्षभरात चार वेळेस छोटय़ा प्रमाणात रक्तदान शिबिरे घेण्यात यावीत, असे राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून वारंवार सांगण्यात येते. तरीही ‘रक्तदान श्रेष्ठदान’ हा संदेश जरा अधिकच गंभीरपणे घेत संस्थांचा महारक्तदान शिबिरे आयोजनाचा आग्रह कायम असतो. मुख्यत: मे, जून व दिवाळीच्या काळात महाविद्यालयांना सुट्टी असल्याने या काळात रक्ताचा तुटवडा जाणवतो. तेव्हा खरे तर रक्तदान शिबिरे आयोजनाकरिता संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. मात्र, गरज नसताना शिबिरे घेतली जात असल्याने रक्ताचा अपव्यय होतो. आताही ‘लालबागचा राजा’ या गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ६ ऑगस्ट रोजी महा रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. यात नागपूर, चंद्रपूर, पुणे, सातारा आणि इतरत्र भागांतील १०० हून अधिक रक्तपेढय़ा सहभागी होणार आहेत. एकाच वेळेस हजारो युनिट रक्त संकलन केल्यामुळे रक्ताचा अपव्यय होण्याची शक्यता जास्त आहे. मंडळाने ४० हजार युनिट रक्त जमा करण्याचा संकल्प केला आहे. मात्र इतक्या प्रमाणात रक्त जमा होत असेल तर ते राज्यभरातील रक्तपेढय़ांना हवाई वाहतुकीद्वारा इच्छित ठिकाणी पोहोचविण्याची व्यवस्था करावी लागेल. या पेक्षा रुग्णांची गरज ओळखून राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या सूचनेनुसार संस्थांनी शिबिरे आयोजित करावी, अशी अपेक्षा वैद्यकीय तज्ज्ञांकडून व कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदे’ने ‘मेगा’ किंवा ’महा’ या शब्दाची व्याख्या योग्य प्रकारे केलेली नाही. त्यामुळे संस्था व राजकीय पक्ष प्रसिद्धीसाठी रक्तदान शिबिरे आयोजित करतात. त्यामुळे परिषदेने या सगळ्यात हस्तक्षेप करायला हवा.

– विनय शेट्टी, थिंक फाऊंडेशन

मंडळाच्या महारक्तदान शिबिरात राज्यातील १०० हून अधिक रक्तपेढय़ा सहभागी होणार आहेत. तसेच आवश्यकता भासल्यास हवाई मार्गानेही रक्त पाठविण्यात येईल.

– सुधीर साळवी, अध्यक्ष (लालबाग राजा गणेशोत्सव मंडळ )

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2017 3:56 am

Web Title: ganpati mandals ngo taking initiative to organised grand blood donation camp
Next Stories
1 खारघर टोल वसुली कंत्राट घोटाळा : ३९० कोटी देण्यास न्यायालयाची मनाई
2 बाजारगप्पा : इस्लामी संस्कृतीची पेठ
3 दळण आणि ‘वळण’ : जीवनवाहिनीचे नियंत्रक
Just Now!
X