News Flash

मुंबईतील चौपाटय़ांवर कचऱ्याचे ढीग

दक्षिणेकडील राज्यांच्या किनारपट्टीवरून पुढे सरकणाऱ्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे रविवारी मध्यरात्रीपासूनच मुंबईत जोरदार वारे वाहू लागले होते.

खवळलेल्या समुद्राच्या पोटातून दीड लाख किलो कचरा किनाऱ्यावर

मुंबई : अरबी समुद्रातून घोंघावत गुजरातच्या दिशेने निघून गेलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादाळाचा मुंबईला तडाखा बसला असून उन्मळून पडलेले वृक्ष आणि जलमय झालेल्या सखल भागांमुळे मुंबईकरांची त्रेधातिरपिट उडाली. त्याच वेळी समुद्रकिनाऱ्यांवर रौद्ररूपी लाटा धडकत होत्या. गेल्या चार दिवसांमध्ये (शनिवार ते मंगळवार) समुद्राच्या पोटातील तब्बल एक लाख ५३ हजार ३८० किलो कचरा लाटांसोबत मुंबईतील चौपाटय़ांवर परतला. मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांनी अखंड कार्यरत राहून चौपाटय़ा स्वच्छ केल्या.

दक्षिणेकडील राज्यांच्या किनारपट्टीवरून पुढे सरकणाऱ्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे रविवारी मध्यरात्रीपासूनच मुंबईत जोरदार वारे वाहू लागले होते. चक्रीवादळ सोमवारी सकाळी मुंबईच्या किनारपट्टीजवळ पोहोचले आणि मुंबईत सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळू लागला. समुद्राला उधाण आले आणि लाटांनी अक्राळविक्राळ रुप धारण केले. समुद्रकिनाऱ्यांवर लाटा धडकू लागल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांना जाण्यास मनाई करण्यात आली. गिरगाव, दादर, चिंम्बाई, जुहू, वर्सोवा, मढ, गोराई आदी चौपाटय़ांवर सोमवारी लाटांचे तांडव सुरू झाले. लाटांसोबत मोठय़ा प्रमाणावर कचरा किनारपट्टय़ांवर साचू लागला. वर्सोवा वगळता अन्य सहा चौपाटय़ांवरून सोमवारी सुमारे १९ हजार १०० किलो कचरा हटविण्यात आला. रस्ते मार्ग बंद झाल्यामुळे वर्सोवा चौपाटीपर्यंत कचरावाहू गाडी पोहोचू शकली नाही. सोमवारी रात्रभर वारा आणि लाटांचे थैमान सुरूच होते. मंगळवारीही काहीशी तशीच परिस्थिती होती. मंगळवारी तब्बल ६२ हजार ०१० किलो कचरा हटवून सातही चौपाटय़ा स्वच्छ करण्यात आल्या.

चौपाटय़ांची स्वच्छता करण्यासाठी पालिकेने कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. काही चौपाटय़ांची यंत्राच्या साह्य़ाने स्वच्छता करण्यात येते. शनिवार, १५ मे रोजी या चौपाटय़ांवरून ३३ हजार ११० किलो, तर रविवार, १६ मे रोजी ३९ हजार १६० किलो कचरा उचलण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 2:17 am

Web Title: garbage piles on mumbais chowpatty ssh 93
Next Stories
1 वादळी पावसात रस्त्यांची दैना
2 ब्रिटिशकालीन उड्डाणपुलांच्या कामांची संथगती
3 रिक्षा-टॅक्सी चालकांचीही करोना चाचणी
Just Now!
X