|| शैलजा तिवले

मुंबई : नवकरोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी आवश्यक जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सीक्वेन्सिंग) चाचण्या कस्तुरबा रुग्णालयातील मध्यवर्ती प्रयोगशाळेतही केल्या जाणार आहेत. यासंबंधीचा प्रस्ताव प्रयोगशाळेने पालिकेच्या नैतिक समितीपुढे सादर केला आहे.

करोना विषाणूचे उत्परिवर्तन होत असून नवे रूप ब्रिटन, दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये आढळले आहे. करोनाची बाधा नव्या विषाणूमुळे झाली आहे का हे पडताळण्यासाठी जिनोम सीक्वेन्सिंग प्रगत चाचणी करणे आवश्यक असते. राज्यात ही चाचणी सध्या पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत (एनआयव्ही) केली जाते. त्यामुळे अशा बाधित रुग्णांचे नमुने जिनोम सीक्वेन्सिंगसाठी पुण्याला पाठविले जातात. परंतु आता या चाचण्या मुंबईतच करता येणार आहेत.

मुंबई पालिकेच्या कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेत आयआयटीतील ‘हेस्टॅक अ‍ॅनॅलिटिक्स’ या कंपनीच्या मदतीने जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्या उपलब्ध होणार आहेत. आयआयटीतील या कंपनीने चाचण्यांचे तंत्रज्ञान विकसित केले असून यासाठी आवश्यक संच कस्तुरबाच्या प्रयोगशाळेला पुरविण्यात येणार आहेत. याचा प्रस्ताव पालिकेच्या नैतिक समितीकडे सादर केला आहे. प्रस्ताव पारित झाल्यावर पहिल्या टप्प्यात १०० प्रवाशांच्या चाचण्या केल्या जातील. त्यानंतर नियमितपणे चाचण्या सुरू होतील, असे कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेच्या प्रमुख डॉ. जयंती शास्त्री यांनी सांगितले.

‘हेस्टॅक अ‍ॅनॅलिटिक्स’ ही स्टार्टअप कंपनी असून विषाणूच्या जनुकीय रचनेच्या मदतीने संसर्गाचा प्रसार कशारीतीने होत आहे, याचे मोजमाप करण्याचे तंत्रज्ञान कंपनीने विकसित केले आहे. विषाणूच्या जनुकीय रचनेत झालेले बदलही शोधण्याचे तंत्रज्ञान कंपनीने विकसित केले आहे.