मुंबईच्या घाटकोपर येथील एका हाउसिंग सोसायटीमध्ये लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करुन समोसा पार्टीचं आयोजन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांवर समोसा पार्टीचं आयोजन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे.

लॉकडाउनच्या काळात समोस पार्टीचं आयोजन करून नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी घाटकोपरच्या पंतनगर पोलिसांनी हाउसिंग सोसायटीच्या सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, घाटकोपरच्या कुकरेजा पॅलेस या सोसायटीमध्ये ही पार्टी आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती आहे. विशेष म्हणजे याच इमारतीत भाजपाचे आमदार प्रकाश मेहताही राहतात, त्यामुळे राजकीय द्वेषातून गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी गृहनिर्माण संस्थेचा अध्यक्ष आणि समोसा पार्टीच्या आयोजकाला अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाल्याची माहिती वृत्तसंस्था एएनआयने दिली आहे.

सोशल मीडियावरही या समोसा पार्टीचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यात कुकरेजा पॅलेसच्या आवारात 20 ते 30 जण एकत्र जमून समोसा पार्टी करत असल्याचे दिसत आहेत. दरम्यान, पुढील चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.