अंधेरीच्या चिमुकलीचा हट्ट ; प्रशासनाकडे नावाची यादी पाठवली

अक्षय मांडवकर, मुंबई</strong>

दोन-तीन दिवसांत भायखळ्याच्या वीरमाता जीजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयातील (राणीची बाग) पेंग्विन कक्षात पाळणा हलण्याची वार्ता पसरताच त्याच्या पिल्लाला आपणच सूचवलेले नाव ठेवावे, असा बालहट्ट एका बालिकेने धरला आहे.

राणीबाग प्रशासनाकडे आकर्षक नावांची यादीच तीने पाठवली आहे. तीचे नाव आहे, मिश्का मंगुर्डेकर. वय वर्षे सहा. ती अंधेरीला राहते आणि जुहू येथील बेसंट मॉन्टेसरी शाळेत पहिल्या वर्गात शिकते. तिने राणीबाग प्रशासनाला नावांची यादी पत्राने पाठवली आहे.

पेंग्विनचे पिल्लू नर असल्यास त्याचे नाव अपॉलो, कुकी, वॉडलर आणि मादी असल्यास तिचे नाव वेलव्हेट, व्हॅनिला, आईस क्यूब यापैकी ठेवण्याचा आग्रह तिने धरला आहे.

पेंग्विनने अंडे दिल्याची बातमी मिश्काला वाचून दाखवल्यानंतर तीने इतर पेंग्विनची नावे ऐकली आणि जन्मास येणाऱ्या पेंग्विनच्या पिल्लाचे नाव ठेवण्याची इच्छा व्यक्त केली, असे मिश्काचे वडील प्रथमेश मंगुर्डेकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. त्यानंतर राणीबागेच्या संचालकांना भेटून त्यांना नावांच्या यादीचे पत्र दिल्याची माहिती मंगुर्डेकर यांनी दिली.

पिल्लाचा जन्म याच आठवडय़ात 

फ्लिपर आणि मोल्ट या पेंग्विन दांपत्य या आठवडय़ातच पिल्लाला जन्म देणार आहे. हम्बोल्ट प्रजातीच्या आठ पेंग्विनना जुलै २०१६ मध्ये दक्षिण कोरियातून राणीच्या बागेत आणण्यात आले. त्यापैकी एका पेंग्विनचा मृत्यू झाला. सात पैकी सहा पेंग्विनच्या जोडय़ा जुळल्या. त्यापैकी मिस्टर मोल्ट (नर)-फ्लिपर (मादी) या जोडीने ५ जुलैला अंडे दिले. मोल्ट आणि फ्लिपर आळीपाळीने अंडे उबवत आहेत. फ्लिपर अधिक काळ अंड उबवत असल्याची माहिती पशुवैद्यकांनी दिली.

राणीच्या बागेत जन्माला येणाऱ्या पेंग्विनच्या पिल्लाला मिश्काने सुचविलेले नाव देण्याबाबत नक्कीच विचार करू.

– डॉ. संजय त्रिपाठी, संचालक, वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालक