सहा दातांचा, दोन दातांचा, चार दातांचा. चांगली तब्येत असलेल्या बकऱ्याची निवड ऑनलाइन करण्यावर यंदा विशेष भर दिसत आहे. गेल्या तीन वर्षांपासून इदच्या निमित्ताने बकऱ्यांचे ऑनलाइन व्यवहार होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र यंदा अनेक छोटय़ा व्यापाऱ्यांनीही ऑनलाइन विक्रीला पसंती दिली असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दहा हजार रुपयांपासून ते अगदी दीड लाख रुपयांपर्यंतचे विविध बकरे ओएलएक्स आणि क्विकरसारख्या संकेतस्थळांवर विक्रीसाठी दिसत आहेत. देशभरातील विक्रेत्यांबरोबरच मुंबईतील विक्रेत्यांनीही यंदा या संकेतस्थळांवर गर्दी केली असून त्यांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतर ई-शॉपिंग संकेतस्थळांप्रमाणे या संकेतस्थळांवर विक्रीसाठी असलेल्या बकऱ्यांच्या किमतीत बाजारातील किमतीपेक्षा फार फरक नसला तरी तुलनेत स्वस्त असल्याचे अंधेरीतील विक्रेता सद्दाम सैय्यद याने स्पष्ट केले. या वर्षी पहिल्यांदाच सद्दामने आपल्या बकऱ्याचा फोटो ऑनलाइन प्रसिद्ध केला आणि त्या जाहिरातीला खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सद्दामने सांगितले.

ओएलएक्सवरील सद्दामच्या या जाहिरातीला सोमवार संध्याकाळपर्यंत सर्वाधिक म्हणजे ४४८५ लोकांनी पाहिले होते. सद्दामचा बकरा हा पंजाबी असून त्याची किंमत चौदा हजार रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत याच दर्जाच्या बकऱ्याच्या बाहेरील बाजारातील किमतीपेक्षा दोन ते तीन हजारांनी कमी असल्याचे सद्दामने नमूद केले. या जाहिराती केवळ अंधेरीतूनच नव्हे, तर मुंबईतील इतर भागांतूनही मला फोन आले आणि माझ्या व्यवसायाविषयी इतरांनाही कळल्याचे समाधानही सद्दामने व्यक्त केले, तर भर गर्दीत बाजारात जाऊन बकरा खरेदी करण्यापेक्षा ऑनलाइन बकरा खरेदीस पसंती देत असल्याच्या प्रतिक्रिया या संकेतस्थळांवर देण्यात आल्या आहेत. यामुळे शहरात विविध ठिकाणी भरणाऱ्या बकऱ्यांच्या बाजारातील खरेदी-विक्रीत फारसा परिणाम झाला नसल्याचेही सद्दामने नमूद केले. ईदच्या पूर्वसंध्येला विविध ठिकाणातील बाजारातही गर्दी दिसून येत होती.