मोसमी चोरांचा सुळसुळाट..

चोरी करणारे भुरटे चोर कसल्या चोऱ्या करतील ते कधी सांगता येत नाही. वडाळा, अ‍ॅण्टॉप हिल भागात सध्या अशाच भुरटय़ा चोरांनी उच्छाद मांडला आहे. कांद्याचे भाव वाढल्यावर या चोरांनी कांद्याची चोरी केली होती आता बकरी ईद आल्यावर बकऱ्यांचीच चोरी केली आहे. गेल्या दोन महिन्यांत बकरे चोरण्याच्या दोन घटना या पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.
वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतीक्षा नगर, वडाळा आणि अ‍ॅण्टॉप हिल झोपडपट्टीचा काही भाग येतो.
मागील महिन्यात कांद्याच्या भावाने उच्चांक गाठला होता. त्या वेळी प्रतीक्षा नगर येथील दुकानातून हजारो किलो कांद्याची चोरी झाली होती. कांद्याची चोरी झाल्याने ती चर्चेचा विषय ठरली होती. त्यामुळे काही कांदा व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावून कांद्याच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकही तैनात केले होते. शुक्रवारी बकरी ईदचा सण आहे. या सणासाठी बकरे कापले जातात. त्याची विक्री दोन महिन्यांपासून सुरू होते. काही व्यापारी आधीच बकरे आणून विक्रीला ठेवतात.
दीड महिन्यांपूर्वी अ‍ॅण्टॉप हिल येथून २५ बकरे एकाच रात्रीत चोरी करण्यात आले होते. त्या चोराला पोलिसांनी काही दिवसात पकडले होते. पुन्हा याच भागातून मंगळवारी रात्री विक्रीसाठी ठेवलेले पाच बकरे चोरण्यात आले. पोलिसांनी लगेच तपास करून या भागातील भुरटय़ा चोराला अटक केली. याबाबत माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गरुड यांनी सांगितले की, बकरे विक्रीसाठी आणताना तात्पुरत्या उभारलेल्या शेडमध्ये ठेवलेले असतात. त्याला पुरेशी सुरक्षा नसते. त्याचा फायदा उचलून ही चोरी केली जाते. बकरे चोरी करून ते विकण्याचा या चोरांचा प्रयत्न होता. कांदे चोर अद्याप सापडले नसून लवकरच त्यांना पकडले जाईल, असेही ते म्हणाले. कांदे आणि बकरे चोरणाऱ्या मोसमी चोरांमुळे हे पोलीस ठाणे चर्चेत आले आहे.