राज्यातील भाजप सरकारने छोटे टोल बंद करून आश्वासनपूर्ती केल्याचे दाखवून दिले असले तरी मुंबई, पुण्याच्या मोठय़ा टोलकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. मुंबईच्या सीमेवरील पाच नाके आणि पुणे द्रुतगती मार्गावरील टोलबाबत नेमलेली समिती ३१ जुलैपर्यंत निर्णय घेणार आहे. मात्र हे सर्व टोलनाके राज्यातील एका बडय़ा ठेकेदाराकडे असून, त्याचे राजकीय हितसंबंध पाहता मुंबईकरांच्या टोलमुक्तीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ५३ नाक्यांवर टोलमधून वाहनचालकांना रविवारी मध्यरात्रीपासून सूट देऊन टोलमुक्ती सुरू झाली आहे.
राज्यातील ५३ नाक्यांवर टोलमधून सवलत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. यानुसार रविवारी मध्यरात्रीपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. दहा मार्गावरील टोल पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. ३१ मार्गावरील नाक्यांवर छोटय़ा वाहनांना टोलमधून सवलत देण्यात आली आहे.
मात्र मुंबईच्या सीमेवरील पाच मोठे नाके आणि पुणे द्रुतगती मार्गावरील टोल नाक्यावरील टोलबाबत अतिरिक्त मुख्य सचिव (बांधकाम) आनंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. ही समिती ३१ जुलैपर्यंत या मार्गावरील टोलबाबत निर्णय घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. हे सर्व टोल नाके राज्यातील एका बडय़ा ठेकेदाराकडे असल्याने त्याबाबत कोणता निर्णय होतो, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, छोटय़ा वाहनांना टोलमधून वगळण्यात आल्याने ठेकेदारांना चालू आर्थिक वर्षांत ३८० कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. या रकमेला ठेकेदारांचा आक्षेप असून, काही ठेकेदारांनी अवजड वाहनांकडून टोलवसुलीसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. या मागण्या शासनाने मान्य केलेल्या नाहीत. टोलमुक्तीच्या शासनाच्या निर्णयाविरोधात ठेकेदारांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. कोणत्याही ठेकेदाराला एकतर्फी स्थगिती मिळू नये या उद्देशाने राज्य शासनाने न्यायालयात कॅव्हेट दाखल केल्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी सांगितले.

घोडबंदर मार्ग, डोंबिवलीकरांना दिलासा
छोटय़ा वाहनांना टोलमधून सवलत देण्याच्या निर्णयामुळे ठाणे शहरातील घोडबंदर मार्ग, शिळ-कल्याण मार्गावरील काटई तसेच भिवंडी-कल्याण मार्गावरील गोवे गावाजवळील टोल बंद झाला आहे. एकात्मिक रस्ते प्रकल्पांतर्गत बारामती, नागपूर, सोलापूर, औरंगाबाद या शहरांच्या टोल नाक्यांवर छोटय़ा वाहनांना सवलत मिळाली आहे.

कोल्हापूरच्या टोलबाबत प्रश्नचिन्ह
कोल्हापुरातील टोलनाक्यांबाबतही समित्यांवर समित्या असा खेळ सुरू असून आता तर या प्रकल्पावरील खर्चाचे मूल्यांकन करण्यासाठी पुन्हा एक समिती नेमण्यात आली आहे. कोल्हापूर टोल नाक्यांवर एम एच ०९ क्रमांकाच्या गाडय़ांना सवलत देण्याची तयारी शासनाने दर्शविली आहे. पण निर्णय कृती समितीने घ्यायचा आहे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. कोल्हापूरचा टोल रद्द करण्याबाबत सर्व पर्यायांचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.