गोविंदा पथकांचा पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीला सर्वाधिक फटका

पश्चिम उपनगरात ठिकठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आल्याने पश्चिम उपनगरात वाहतूक कोंडी जाणवत होती. याचा सर्वाधिक फटका पश्चिम द्रुतगती महामार्गाला बसला.

बोरिवलीला मागाठाणे येथील ‘तारामती चॅरिटेबल फाऊंडेशन’च्या वतीने आमदार प्रकाश सुर्वे दहीहंडीचे आयोजन करतात. या ठिकाणी गोविंदा पथकांनी मोठय़ा प्रमाणात सहभाग नोंदविला. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी जाणवली. ठाणे, दादर, परळच्या तुलनेत मोठय़ा दहीहंडीचे आयोजन पश्चिम उपनगर परिसरात तुरळकच असते. त्यामुळे विरार ते वरळीपासून अनेक गोविंदा पथके मागाठाण्यात सहभागी होतात. दुपारी तीन वाजेपर्यंत या ठिकाणी सुमारे १२५ लहानमोठय़ा गोविंदा पथकांनी व १० महिला गोविंदा पथकांनी हजेरी लावली होती, अशी माहिती आयोजक प्रकाश सुर्वे यांनी दिली.

बहुतांश गोविंदा पथकांनी दुचाकी, खासगी बस, ट्रक, लॉरीतून प्रवास केला. या गोविंदा पथकांची वाहने या परिसरात महामार्गालगतच उभी केली जात असल्याने मागाठाणे सिग्नल ते बोरिवली फलाट क्रमांक ८ कडे जाणारा रस्ता, राजेंद्रनगर, टाटा पॉवर परिसरातील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

कचऱ्याचे ढीग

सकाळपासून घराबाहेर पडल्यावर गोविंदा पथकांकरिता ठिकठिकाणी खाण्यापिण्याची सोय करण्यात आली होती. वडापावपासून ते पुलाव, बिर्याणी, पावभाजी अनेक ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, पोटपूजा केल्यानंतर प्लॅस्टिकच्या ताटल्या, पाण्याच्या बाटल्या रस्त्यावरच टाकण्यात येत होत्या. त्यामुळे दहीहंडी परिसरातील रस्त्यांवर जागोजागी कचऱ्याचा खच पडलेला पाहायला मिळाला.   बहुतांश गोविंदानी दुचाकीवरून विना हेल्मेट प्रवास केला. अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रण करताना दिसत होते. पश्चिम द्रुतगतीोहामार्गावर दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी असल्यामुळे दोन रुग्णवाहिकांना सव्‍‌र्हिस रोडने जाण्यास पोलिसांना मार्ग मोकळा करून द्यावा लागला.